लाचेची मागणी करणा-या मंडळ अधिका-याविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

जमीनीच्या ७/१२ उता-यावरील नोंदीबाबत सकारात्मक अहवाल देण्यासाठी पानशेत (ता. वेल्हा) येथील मंडळ अधिका-याने २५ हजारांची लाचेची मागणी केली होती. या अधिका-या विरुद्ध शुक्रवारी (दि.१८) सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल करण्यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अधिकाऱ्याची पडताळणी केली होती. हा प्रकार ३१ जानेवारी २०१८ रोजी घडला होता.

वेंकटेश रामचंद्र चिरमुल्ला (वय -५० मंडळ अधिकारी पानशेत, ता. वेल्हा, जि.पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अधिका-याचे नाव आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार यांच्या जमिनीच्या 7/12 उताऱ्यावरील दुरुस्ती केलेल्या नोंदीबाबत सकारात्मक अहवाल वरिष्ठांना पाठवायचा होता.  सकारात्मक अहवाल पाठवण्यासाठी वेंकटेश चिरमुल्ला याने २५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली. तक्रारदारने याची माहिती लाचलुचत प्रतिबंध विभागाकडे केली.पोलिसांनी पडताळणी केली व लाचेची मागणी होत असल्याचे समोर आले. त्यानुसार सहकारनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार वेंकटेश चिरमुल्ला याच्यावर शुक्रवारी (दि.१८) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई एसीबीचे पोलीस निरीक्षक जालिंधर तांदळे यांच्या पथकाने केली. पोलीस निरीक्षक अर्चना बोदडे तपास करीत आहेत.