पोलीस अधिकाऱ्याचा अ‍ॅट्रॉसिटीचा अहवाल न्यायालयाने केला रद्द

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन – जिंतूर येथील तात्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर काळे यांनी अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणात खोटी फिर्य़ाद दिल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला होता. हा अहवाल परभणी जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी-फलके यांनी फेटाळण्याचा आदेश दिला आहे.

जिंतूर तालुक्यातील वरुड येथील भीमराव कान्होजी हजारे यांनी अकोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोप वाटीका सामाजिक वनीकरण कार्यालयातील लागवड अधिकारी एस.आर. खुपसे यांच्याकडे माहिती अधिकारात माहिती मागविली होती. त्यावेळी खुपसे यांनी जातीवाचक शिविगाळ केली असल्याची फिर्याद हजारे यांनी केली होती. या प्रकरणात खुपसे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात चार्जसीट दाखल न करता तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर काळे यांनी फिर्याद खोटी असल्याचा अंतीम अहवाल सत्र न्यायालयात दाखल केला होता. या प्रकरणावर सुनावणी दरम्यान न्यायालयाने हा अहवाल फेटाळण्याचे आदेश दिले. या प्रकरणात फिर्यादी भीमराव हजारे यांच्यातर्फे अ‍ॅड. जितेंद्र घुगे यांनी युक्तीवाद केला. या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचा जबाब घेतला असून त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली असल्याचे म्हटले आहे. तसेच विवध कागदपत्रे न्यायालयात दाखल करण्यात आली असल्याचे अ‍ॅड. घुगे यांनी सांगितले.

या प्रकरणात आरोपीला मदत करण्यासाठीच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी अंतीम अहवाल दिला असल्याचा युक्तीवाद घुगे यांनी केला. हा युक्तीवाद ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी-फलके यांनी हा अहवाल फेटाळण्याचा आदेश दिला.