नवीन वर्षाच्या स्वागताला शिर्डीत भाविकांची गर्दी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी लाखो साईभक्तांनी साई दरबारात हजेरी लावली. त्यामुळे साईनगरी गर्दीने फुलून गेली आहे.

काल सकाळपासूनच शिर्डीत भाविकांनी गर्दी केली होती. देशातील साई भक्तांसह परदेशातील साई भक्तांनी साई नगरीत हजेरी लावत नववर्षाचे स्वागत केले. रात्री 12 वाजता साईंचं दर्शन घ्यावं या उद्देशाने भाविकांनी दर्शनबारीत प्रवेश केल्याचं प्रकर्षाने जाणवलं.

गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासह अनेक राजकीय नेते अधिकारी व सेलिब्रिटी दर्शनासाठी साई दरबारी आले होते. गर्दी लक्षात घेऊन अहमदनगर जिल्हा पोलीस प्रशासन व मंदिर सुरक्षा विभागाच्यावतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दरम्यान, साईनगरीत नवीन वर्षाचं स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आलं. अनेक तास रांगेत उभं राहात भाविकांनी नवीन वर्षात सुख – शांती आणि स्वास्थ्यासाठी साईबाबांना साकडं घातलं.

साईबाबा संस्थाननेही नवीन वर्षाचं स्वागत करताना साईसमाधी मंदिर, द्वारकामाई, चावडी आणि गुरुस्थान मंदिराला आकर्षक फुलांनी सजवलं. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली. गर्दीच्या काळात साई भक्तांची मात्र चांगलीच तारांबळ उडताना दिसली.

शिर्डी संस्थानचे सर्व भक्त निवास हाऊसफुल्ल झाले आहेत. तर शिर्डीतील शेकडो हॉटेलवरही साईभक्तांची मोठी गर्दी आहे. एकंदरीत शिर्डीत नववर्षाच्या स्वागतासाठी भक्तांचा मेळा जमला आहे.