वैशाख पौर्णिमेनिमित्त शहाळ्यांमध्ये ‘दगडूशेठ’बाप्पा विराजमान

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन 

वैशाख वणव्यापासून तमाम भारतीयांचे रक्षण व्हावे, दुष्काळ, पाण्याचे प्रश्न, शेतक-यांच्या समस्या गणरायाच्या कृपेने निर्विघ्न व्हाव्यात, या सद्भावनेने दगडूशेठ गणपती मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला. पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त आयोजित शहाळे महोत्सवात तब्बल ५ हजार शहाळ्यांमध्ये गणपती बाप्पा विराजमान झाले. नारळाची प्रतिकात्मक झाडे आणि शहाळ्यांनी सजविलेला मंदिराचा परिसर पाहण्याकरीता पुणेकरांनी मोठी गर्दी केली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला. अक्कलकोटचे अ‍ॅड. रवींद्र खैराटकर यांनी गणपती बाप्पांना तब्बल ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य अर्पण केला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, सुनील रासने यांसह विश्वस्त व कार्यकर्ते उपस्थित होते.

अशोक गोडसे म्हणाले, वैशाख पौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्री गणेशाचा पुष्टिपती विनायक हा अवतार झाला होता. भारतीय संस्कृतीमध्ये वैशाख पौर्णिमेला महत्त्वाचे स्थान आहे. उत्तर भारतामध्ये वैशाखी हा सण याच दिवशी विशेषत्वाने साजरा केला जातो. वैशाख वणव्यापासून देशवासियांचे रक्षण व्हावे. दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष शेतक-यांच्या समस्या गणरायाच्या कृपेने निर्विघ्न व्हाव्यात, या सद्भावनेने शहाळ्यांचा महानैवेद्य दरवर्षी अर्पण करण्यात येतो.  तसेच, दुस-या दिवशी ससून रुग्णालयातील रुग्णांना शहाळ्यांचा प्रसाद देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.