आत्महत्या करणाऱ्या प्रियकराचा जिगरबाज प्रेयसीने वाचवला जीव 

वसई : पोलीसनामा आॅनलाईन – प्रेम म्हटलं की रुसवे फुगवे आले भांडण ही आलीच. परंतु यावेळी जोडीदाराला समजून घ्यायचं की रागाच्या भरात काही पाऊल उचलायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. अनेकांकडून अशा परिस्थितीत काहींकडून गुन्हाही घडतो तर काहीजण आत्महत्याही करतात. अशीच एक आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. परंतु प्रेयसीचे प्रसंगावधान चांगलेच कामाला आले.

एका तरुणाने चक्क आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या  प्रेयसीने जीवाची बाजी लावली आणि सदर तुरुणाचे प्राणही वाचवले. सदर घटनेचा व्हिडीआेही समोर आला आहे. रियाझ अहमद अंसारी असं या तरुणाचं नाव असून तो आपल्या प्रेयसीसोबत  लिव्ह इन रिलेशनमध्ये होता. वसईत गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. आजूबाजूच्या नागरिकांनी या घटनेचा व्हिडीओ काढला आहे.

रियाझ एका महिलेसोबत लिव इन रिलेशनमध्ये राहत होता. तिच्याशी त्याचं भांडणही झालं होतं. आत्महत्या प्रयत्न केला तेव्हा या महिलेनेच त्याचे प्राण वाचवले.  रियाझ इमारती वरून उडी मारण्याच्या तयारीत असताना त्या महिलेने रियाझचे दोन्ही हात घट्ट पकडून ठेवले. तब्बल 15 मिनिटे तिने हात पकडून ठेवले होते. रियाझ नायगांव परिसरातील नक्षत्र टॉवर मध्ये राहत होता.

तब्बल 15 मिनिटे या दोघांची धरपकड सुरू होती आणि हा मृत्यूचा तांडव सुरु होता. अखेर सोसायटीच्या वॉचमॅनने तिथे जाऊन रियाझला वर खेचलं आणि अखेर रियाझचे प्राण वाचले. समोर आलेल्या माहितीनुसार रियाझ हा मानसिक तणावाखाली होता असे समजले आहे. इतकेच नाही तर याच तणावातून त्याने आत्महत्या करण्याचा हा प्रयत्न केला आहे असेही समजत आहे. महत्त्वाचे म्हणजे सदर आत्महत्या करण्याच्या प्रयत्नाच्या घटनेपूर्वी रियाझचे सदर महिलेसोबत भांडण देखील झाले होते अशीही माहिती मिळाली आहे. यावेळी परिसरातील नागरिक तेथे जमा झाले होते. त्यांनीच या घटनेचा व्हिडीआे बनवला आणि त्यांना वलीव पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.