एटीएम कार्ड क्लोनिंगच्या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

सुरक्षा रक्षक नसलेल्या एटीएम सेंटरमध्ये स्किमर लावून नागरिकांच्या एटीएम कार्डची माहिती घेऊन, त्याद्वारे बनावट एटीएम कार्ड तयार करुन पैसे लुबाडणा-या टोळीच्या मुख्य सुत्रधारासह दोघांना अटक करण्यात आली आहे. पुणे सायबर क्राईम सेलच्या पथकाने ही कारावाई केली.

रोहीत नायर आणि गुन्ह्याचा मुख्य सुत्रधार यासीर अब्दुल सय्यद असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

बनावट एटीएम कार्डद्वारे वेगवेगळ्या शहरातून एटीएममधून पैसे काढून नागरिकांची फसवणूक करणा-या टोळीला सायबर सेलने यापूर्वीच अटक केली आहे. परंतू या गुन्ह्याचा मुख्य सुत्रधार पोलिसांना गुंगारा देते होते. या गुन्ह्यातील आरोपी रोहीत नायर याचा फेसबुकच्या माध्यमातून शोध घेऊन अटक केली. परंतू मुख्यसुत्रधार यासीर सय्यद हा पोलिसांच्या हाती लागत नव्हता. पोलिसांनी त्याचा माग काढून त्याला मुंबई येथून अटक केली.

तपासादरम्यान पोलिसांनी यासीर सय्यद याच्या घराची झडती घेतील. त्यावेळी घरामध्ये कार्ड क्लोनिंगसाठी बनविण्यात येणारे स्किमर तयार करण्याचे साचे, वेगवेगळ्या केसांचे विग, कार्ड प्रिंन्टर व इतर वस्तू जप्त करण्यात आल्या. अटक केल्यानंतर त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ मोबाईल, कार्ड रिडर जप्त करण्यात आले. तसेच त्याने मुंबई, दिव दमन, कोलकत्ता या ठिकाणी गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

ही कारावाई पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ यांचे मार्गदर्शनाखाली सायबर क्राईम सेलचे पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन गवते, पोलीस उपनिरीक्षक प्रविण स्वामी, कर्मचारी किरण अब्दागिरे, आदेश चलवादी, अतुल लोखंडे, दिपक भोसले यांच्या पथकाने केली.