पाणी प्रश्नावर मंत्री अभ्यास करत आहेत : एकनाथ खडसे 

नंदूरबार : पोलीसनामा ऑनलाईन – माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पाण्याच्या मुद्द्यावरून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सरकारवर टीका केली आहे. यावरून एकनाथ खडसे आपल्याच सत्ताधारी पक्षाच्या सरकारला झोडायची एकही संधी सोडत नसल्याचे वारंवार समोर येत आहे.सातपुडा साखर कारखान्याचा ४४  वा गळीत हंगामाचा शुभारंभ आमदार एकनाथराव खडसे यांच्या हस्ते बुधवारी झाला. यावेळी आमदार अमरिशभाई पटेल, आमदार उदेसिंग पाडवी, जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक आदी उपस्थित होते.
गिरीश महाजन यांनी ४  वर्षात प्रश्न सोडवला नाही, मंत्री अपयशी ठरलेत का ? असे विचारले असता मंत्री अभ्यास करत आहेत, असा टोला त्यांनी गिरीश महाजनांना लगावला.एकनाथ खडसे म्हणाले की , ‘शहादा तालुक्यातील प्रकाशा आणि सारंगखेडा बॅरेजचे पाणी असून शेतकऱ्यांना देऊ शकत नाही. सरकार आमचं असून उपसा सिंचन योजना सुरू झाली नाही, याची खंत वाटते. या संदर्भात मी सातत्याने मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करतोय. ३ महिन्यात काम मार्गी लावेल. ‘
 काही दिवसांपूर्वी पक्षानं आदेश दिल्यास जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात काम करण्यास तयार असल्याचे वक्तव्य खडसे यांनी केलं होतं.  “सध्या गिरीश महाजन हे जिल्ह्याचे नेते आहेत. पण मी पक्षाचा कोणताही नेता नाही. त्यामुळेच त्यांच्या नेतृत्त्वात मी काम करण्यास तयार आहे. पण हे करताना मी कोणत्याही वाईट प्रवृत्तींना साथ देणार नाही” ,असेही खडसे म्हणाले होते.
मंत्रिपद देणे मुख्यमंत्रांच्या हातात –
राज्य सरकारला आज ४ वर्ष पूर्ण होत आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्याचर्चांना उधाण आले असतांना खडसे यांना  पुन्हा मंत्रिपद मिळेल का? असा प्रश्न विचारला असता या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्रीच देऊ शकतील, तो सर्वस्वी अधिकार त्यांचा आहे, असं म्हणत नाराजीचा सूर व्यक्त केला
मंत्रीपदापासून दूर राहिल्याची खंत आमदार खडसे यावेळी लपवू शकले नाही. ते म्हणाले, ४० वर्ष समाज व राजकारणात आहे. एकही निवडणूक हरलो नाही, एकही गुन्हा नाही, भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध झालेला नाही. असे असतांना आपले काय चुकले? असा प्रश्न करीत भाजप सत्तेवर यावी म्हणून रक्ताचे पाणी केले, पण सत्ता मिळताच मंत्रीपदापासून दूर ठेवले गेले.