पोलीस दलात लवकरच मेगा भरती, गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या पाच वर्षात पोलीस भरती झालेली नाही. राज्यातील पोलीस दलात मनुष्यबळ अपुरे आहे. त्यामुळे लवकरच राज्यात पोलीस दलात मोठी मेगा भरती होणार असून, तशी माहिती खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. राज्यात 8 हजार पोलीसांची भरती केली जाणार असून, त्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

राज्याचा गृहमंत्री पदभार स्विकारल्यानंतर प्रथमच पुणे आयुक्तालयाला भेट दिली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम सह पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, संजय शिंदे, तसेच पोलीस उपआयुक्त आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

राज्यात गेल्या पाच वर्षात राज्यात पोलीस भरती प्रक्रिया झालेली नाही. पोलीस दलात मनुष्यबळाचा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे येत्या काळात मोठी पोलीस भरती प्रक्रिया होणार आहे, असे सांगून गृहमंत्री देशमुख म्हणाले, राज्यभरात 8 हजार पोलीसांची भरती केली जाणार आहे. भरती प्रक्रिया करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. लवकरची त्याबाबत जाहिरात निघेल. त्यातून तरूणांना नोकर्‍या मिळतील.

पोलीस भरती सोबतच राज्य सरकार 7 हजार कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षक भरती करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. त्यांना पगारही 18 हजार रुपये देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फतही भरती केली जाणार आहे. त्याला बारावी पास असणार्‍या तरूणांना अर्ज करता येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्य सरकार एकाच वेळी पोलीसांची 8 हजार पदे आणि सुरक्षा रक्षकांची 7 हजार पदे भरणार असल्याने राज्यातील तरूणांना मोठी संधी प्राप्त होणार आहे. या दोन्ही भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

You might also like