‘त्या’ जिंदादिल पोलीस अधिकाऱ्याला पोलीस खात्यातून वाजतगाजत निरोप

बीड : पोलिसनामा ऑनलाईन – खरेतर सर्वसामान्य माणसाच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा डोळ्यात तेल घालून काम करीत असते. पोलीस खात्यात अशीही काही माणसं असतात जी आपल्या कर्त्यव्याबरोबरच माणुसकी देखील जपतात. आपल्या कामातून लोक अशा पोलिसांना सदैव आठवणीत ठेवतात अगदी त्यांच्या निवृत्तीनंतरही. बीड जिल्ह्यातील माजलगाव मध्ये देखील असेच एक जिंदादिल पोलीस अधिकारी आहेत काल ३१ डिसेंबर रोजी ते आपल्या कार्यातून निवृत्त झाले. या पोलीस अधिकाऱ्याला गाजत वाजत मिरवणून काढून निरोप देण्यात आला. माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिर्जा बेग असे त्यांचे नाव आहे.
काल ३१ डिसेंबर रोजी एकीकडे सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे जंगी स्वागत केले जात होते मात्र बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये पोलीस दलातून निवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्यालासुद्धा अगदी वाजतगाजत मिरवणूक काढून निरोप देण्यात आला. माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिर्जा बेग हे ३१ डिसेंबरला सेवेतून निवृत्त झाले. बेग यांनी ३४ वर्षे पोलीस खात्यात सेवा केली. यांनी ज्या ज्या ठिकाणी काम केले. तिथे पोलीस खात्याची मान उंचवण्याचे काम केले. स्त्री भ्रूण हत्येतील आरोपी सुदाम मुंडे याला गजाआड करण्यात सुद्धा बेग यांचा मोठा वाटा आहे. सुदाम मुंडेच्या प्रकरणात बेग यांनी तपासाची चोख भूमिका बजावली होती.

बेग यांनी जिथे नोकरी केली तिथल्या आपल्या सहकाऱ्यांसोबत आणि नागरिकांसोबत सुद्धा चांगला संवाद ठेवला. यामुळे मिर्जा बेग यांच्याबद्दल बीड जिल्ह्यातील लोकांना नेहमीच आपुलकी असायची.

म्हणूनच अशा जिंदादिल पोलीस अधिकाऱ्याला निरोप देण्यासाठी माजलगाव शहरातील पोलीस दल हजर होते. वाजत गाजत भव्य मिरवणूक काढून या पोलीस अधिकाऱ्याला निरोप देण्यात आला.  पोलीस खात्यामध्ये असे दृश्य खूप कमी वेळा पाहायला मिळते.मिर्जा बेग हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील  आहेत. मात्र मागच्या बारा वर्षांपासून बीड जिल्ह्यात कार्यरत होते.