अवघे गर्जे पंढरपूर….15 लाख भाविकांच्या उपस्थितीत दुमदुमली पंढरी

पंढरपूर : पोलीसनामा आॅनलाईन-

विठ्ठल..विठ्ठल…जय हरी च्या नामघोषात शेकडो मैल पायी प्रवास करत पंढरीत दाखल झालेल्या लाखो विठ्ठलभक्तांनी चंद्रभागेत स्नान करुन आज आषाढी एकादशी निमित्त आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेतले. अतिशय शिस्तबद्ध आणि भक्तीमय वातावरणात 15 लाख विठ्ठलभक्तांच्या उपस्थितीत आषाढी एकादशीचा आजचा महासोहळा संपन्न झाला.
[amazon_link asins=’B00RBGYGMO’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’49cae175-8e84-11e8-b8df-d1674aa1d5f2′]

विठ्ठल पूजेसाठी मुख्यमंत्र्यांनी हजेरी न लावल्यामुळे शासकीय महापूजेचा मान सर्वसामान्य वारकरी जाधव दांपत्याला देण्यात आला. वारकरी म्हणून महापूजेचा मान मिळालेले अनिल जाधव आणि वर्षा जाधव हे हिंगोली जिल्ह्यातील भगवती गावचे रहिवासी आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे महापूजा होत असताना राज्य मंत्रीमंडळातील मंत्री आणि प्रशासनातील जेष्ठ अधिकारी शासकीय पूजेत भाग न घेता बाजूला उभे राहत हा सोहळा पाहत असल्याचे चित्र बघायला मिळाले.

यावर्षी भाविकांनी केलेल्या अलोट गर्दीमुळे विठुरायाच्या दर्शनी रांगेची लांबी मंदिरापासून तब्बल आठ किलोमीटरपर्यंत पोहोचली होती. यामुळे दर्शनासाठी उशीर लागत होता. पहाटे 1 वाजल्यापासून लाखोंच्या संख्येने विठ्ठलभक्त चंद्रभागा स्नानासाठी दिंड्या घेऊन बाहेर पडलेले दिसत होते. चंद्रभागेतील पवित्र स्नान करुन या दिंड्यांनी नगरप्रदक्षिणा घालत कळसाचे दर्शन घेतले. अगदी पहाटेपासूनच चंद्रभागेच्या काठावर लाखों भाविकांमुळे अवघे वाळवंट गजबजून गेले होते. प्रचंड गर्दीमुळे अनेक भाविकांना मुख दर्शनावरच समाधान मानावे लागत होते.

जाहिरात