सध्याचा अस्वस्थ करणारा काळ सर्वच कलाविष्कारांसाठी पोषक : लक्ष्मीकांत देशमुख

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन

आजची आपल्या भोवतालची परिस्थिती प्रचंड अस्वस्थ करणारी आहे. राजकीय, सामाजिक अशा सर्वच क्षेत्रात कोंडी झाली असून मार्ग सापडत नाहीये. अशा परिस्थितीत खर्‍या संवेदनशील कवी, लेखक आणि कलाकार अधिक खोलपणे समाजाच्या वेदना मांडू शकतात, हे आजपर्यंतच्या इतिहासाने सिद्ध केले आहे. याविषयी पोलंडचे उदाहरण खरोखरच बोलके आहे. त्यामुळेच सध्याचा अस्वस्थ करणारा काळ सर्वच कलाविष्कारांसाठी पोषक आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक प्रा.लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.

रंगत-संगत प्रतिष्ठानच्या काव्यविभागातर्फे पत्रकारांच्या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर, रंगत-संगत प्रतिष्ठानच्या काव्य विभागाच्या कार्याध्यक्षा प्रभा सोनवणे उपस्थित होते.

यावेळी बोलताना लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले की, सध्याच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा सगळ्याच क्षेत्रातील अधःपतनाच्या काळात स्वतःमधील संवेदनशीलता कवितेच्या रूपाने जपण्याचे काम पत्रकार करीत आहेत, ही खरोखरच दिलासादायक बाब आहे. आजच्या काळातील त्यांची कविता जोमाने फुलणारी असेल, अशी माझी अपेक्षा आहे. पत्रकारांना एकाचवेळी विविध क्षेत्रांचे वार्तांकन करावे लागते. त्यामुळे समाजातील अनेक प्रश्नांचे, घटनांचे त्यांचे आकलन खूप महत्त्वपूर्ण असते. त्याचबरोबर पत्रकार कवींनी अन्य कवींची शैली, त्यांच्या कविता यांचा आवर्जुन अभ्यास केला पाहीजे. मुख्यतः नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ आणि वसंत आबाजी डहाके या तीन कवींचे लेखन वाचलेच पाहिजे, असे आहे. कारण या कवींनी प्रकर्षाने समाजवास्तवाचे चोखपणे व्यक्त केले आहे. आपल्या पूर्वसुरींचे ऋण आपल्यावर असते, मात्र कोणत्याही कवीच्या शैलीचे अनुकरण न करता स्वतःची वेगळी शैली निर्माण करण्यात खरी सृजनशीलता आहे. पत्रकार असलेल्या कवींच्या कवितेला वेगळा स्पर्श असतो, हे पत्रकार कवींचे बलस्थान आहे. एखाद्या पत्रकार कवीने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले तर मला निश्चितच आनंद होईल.

या काव्य संमेलनात मंगेश महाले, स्वप्निल पोरे, संजय एलवाड, गोविंद वाकडे, रचना विचारे- बोऱ्हाडे, स्मिता पाटील, मीलन म्हेत्रे, गायत्री पाठक, राजेंद्रकृष्ण कापसे, पितांबर लोहार, जितेंद्र मैड, लक्ष्मण मोरे, युवराज नायर, सारिका आहेर, सुवर्णा अनंता येनपुरे, प्रज्ञा दिवेकर आदीं पत्रकार कवींनी विविध विषयांवरील आपल्या कवितांव्दारे परखड पण संवेदनशील पत्रकार मनाचे दर्शन घडविले. या कार्यक्रमाचेप्रास्ताविक रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर यांनी केले, तर सूत्रसंचालन पत्रकार कवयित्री रूपाली अवचरे आणि पत्रकार शिल्पा देशपांडे यांनी केले.