दिलासादायक ! बारामतीतील 14 जणांचे ‘कोरोना’चे रिपोर्ट ‘निगेटिव्ह’

पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरातील विविध भागात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर बारामतीमध्येही विषाणूची बाधा नागरिकांना झाली आहे. बारामतीमध्येही आतापर्यंत 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांमधील 14 जणांची तपासणी करण्यात आली. त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे बारामतीकरांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

कोरोनामुळे बारामतीत नागरिकांच्या मनामध्ये भीती वाढत चालली आहे. एकाच कुटूंबाच्या संपर्कामुळे नातेवाईकांमधील 14 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, तरीही कुटुंबातील मुख्य दोन जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. त्यामुळे त्यांचे रिपोर्ट आल्यानंतरच कोरोनाचा संसर्ग कसा झाला ते स्पष्ट होणार आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे बारामतीतीलही धोका आणखी वाढला असून आता शहरात कडक अंमलबजावणी राबवली जात आहे.

विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी नगरपरिषदेच्या परिसरातील 44 वार्डामधील 44 नगरसेवक 44 झोनल ऑफिसर व 44 पोलिस कर्मचारी मिळून प्रत्येक वार्डातील 10 ते 20 स्वयंसेवकांच्या माध्यमातून नागरिकांना अत्यावश्यक घरपोच सुविधा पोहोच करणार आहेत. त्यामुळे कुठल्याही नागरिकांना आता घराबाहेर पडता येणार नाही. बारामती शहरातील एका स्वयंसेवकास लॉकडाऊनच्या कालावधीत 35 ते 40 कुटुंबाला मदत करावी लागणार आहे.

स्वयंसेवक प्रत्येकाच्या घरी जाणार असून कुटुंबीयांना अत्यावश्यक बाबीची गरज नोंदवून घेत त्यांना मदत करणार आहेत. त्यामुळे नागरिकांना घरपोच अत्यावश्यक वस्तू मिळणार आहे. त्यात भाजीपाला, औषधे आदी देण्यात येणार आहे. यामुळे कोरोनाचा व्हायरस संसर्ग मुळापासून नष्ट करता येईल. नागरिकांना घरी बसून सर्व सेवा मिळतील. पोलिसांना शहरात गस्त आणि संपर्कासाठी स्वयंसेवकांना वॉकी-टॉकी देण्यात आली आहे. त्यामुळे तात्काळ पोलिस घटनास्थळी पोहोचणार आहेत.