संविधान सभेतील डॉ. आंबेडकरांच्या भाषणाचे अभिवाचन

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण संवैधानिक मार्गाची कास धरली पाहिजे. संविधान कितीही चांगले असो, ते राबवणाऱ्यांची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. लोकशाहीच्या रक्षणासाठी आपण सामाजिक व आर्थिक हेतू साध्य करताना घटनात्मक साधनांचा मार्ग अवलंबला पाहिजे. हे साक्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान सभेतील भाषणाचे अभिवाचन ऐकताना श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.
राज असरोंडकर, वृषाली विनायक आणि प्रफुल्ल केदारे या मुंबईच्या तरुणांनी या बहुचर्चित भाषणांचे अभिवाचन केले. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे समारोपाचे भाषण होवून त्यादिवशी भारताचे संविधान संमत करण्यात आले. त्याच्या एक दिवस आधी २५ नोव्हेंबर रोजी घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले होते.

भारतीय राष्ट्रनिर्मितीची मूलतत्त्वे सांगणारे हे भाषण प्रसिद्ध आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्या वतीने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. पी. विठ्ठल यांनी प्रास्ताविक केले. जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, सुनील रावळे, नितीन गायकवाड यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

या वेळी ज्येष्ठ पत्रकार राम शेवडीकर, डॉ. राम जाधव, डॉ. राजेश्वर दुडूकनाळे, डॉ. चंद्रकांत बावीस्कर, डॉ. अविनाश कदम, डॉ. राजेंद्र गोणारकर, डॉ. दवणे, डॉ.शालिनी कदम, डॉ. नीना गोगटे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी संदीप एडके, माधव जायभाये, सुनील ढाले यांनी प्रयत्न केले.