‘त्या’ नगरसेवकाच्या विषबाधा प्रकरणातील संशयित पोलीस चाैकशीला गैरहजर

सोलापूर : पोलीसनामा आॅनलाइन – सोलापूर शहरात सध्या नगरसेवकावर विषप्रयोग केल्याचे प्रकरण गाजत आहे. विषबाधेवर मागील अनेक दिवसांपासून उपचार घेत असलेले भाजपाचे नगरसेवक सुरेश पाटील यांनी यासंदर्भात महापौर शोभा बनशेट्टी, अशोक निंबर्गी, अविनाश महागावकर, सुनील कामाटी, श्रीशैल बनशेट्टी यांनीच विष घातल्याचा आरोप पत्रकार परिषदेमध्ये केला होता. यानंतर पोलिसांनी या सर्वांना नोटिसा बजावून चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले होते. मात्र यापैकी कोणीच चौकशीसाठी आले नाहीत, पोलीस सूत्रांनी सांगितले.

यापैकी दोघे साक्षीदार पोलीस ठाण्यात आल्याने त्यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या आहेत. काही पानाचे नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. नगरसेवक सुरेश पाटील यांनी पाच जणांची नावे सांगितली होती. या प्रकारानंतर भाजपात खळबळ उडाली होती. सर्व संशयीत हे भाजपामधीलच असल्याने वेगळीच चर्चा सोलापुरात सुरू झाली आहे. संशयीत असलेल्या पाच जणांस नोटीस देण्यात आली होती. मात्र, यापैकी कुणीच आले नाहीत, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणातील दोघे साक्षीदार आले होते, त्यांनी त्यांचा जबाब पोलिसांना दिला असून तो नोंदवून घेण्यात आला आहे. हे दोघे साक्षीदार कोण हे पोलिसांनी सांगितले नाही.

सोलापूर पोलीस आयुक्तालय स्थापन झाल्यापासून अशा प्रकारचा गुन्हा तपासासाठी पहिल्यांदा पोलिसांकडे आल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत. सुरेश पाटील यांना बनारस चटणी पान खाण्याची सवय होती. दिवसातून आठ ते दहा वेळा ते पान खात होते. तसेच रात्रीच्या वेळी कार्यक्रमात अथवा जागरण झाल्यास सुमारे १८ ते २० पान खात होते. त्याचबरोबर त्यांना भेटण्यासाठी येणारे लोकही त्यांना पान खाण्यासाठी घेऊन येत होते. ते खात असलेल्या पानापासून विषबाधा होऊ शकते का, याची पडताळणी केली जात आहे. याबाबत काही नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. अद्याप त्याचा अहवाल आलेला नाही.