Pune : शिक्षण शुल्काबाबत समन्वयातून मार्ग काढला जाईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  शिक्षण संस्थांनी शाळा सुरू नसताना पूर्णपणे शुल्क आकारणे चुकीचे आहे. शिक्षण संस्थांची अडचण आहे म्हणून त्यांनी पालक आणि विद्यार्थ्यांना वेठीस धरणे योग्य नाही. त्यासाठी समन्वय साधून योग्य तो मार्ग काढला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितले.

हडपसरमधील मुकेश वाडकर यांनी कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोना महामारीमुळे शाळा ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत. मात्र, शाळा व्यवस्थापन संपूर्ण शुल्क भरण्यासाठी पालकांकडे तगादा लावत आहे. ज्यांनी शुल्क भरले नाही, त्यांच्या पाल्याचे गुणपत्रक राखून ठेवत आहे, पुढील वर्गात प्रवेश देत नाही, ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेण्यात मज्जाव करीत असून, त्यांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, याबाबत पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे विचारणा केली. यावेळी पवार म्हणाले की, राज्य शासनातील शिक्षण विभागाने चांगले निर्णय घेतले आहे. शाळा सुरू नसताना १०० टक्के शुल्क घेणे विद्यार्थी आणि पालकांवर अन्यायकारक आहे. शिक्षण संस्थांची अडचण आहे. मात्र, अडचण असली तरी त्यांच्या अडचणीसाठी विद्यार्थी आणि पालकांची अडचण करण्याचा अधिकार त्यांना दिला नाही. त्यासाठी समन्वयातून मार्ग काढला जाईल, असे त्यांनी सांगिले.