जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी पुण्यात; ‘सीरम’ इन्स्टिट्यूटची कमाई किती?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसच्या महामारीनं मोठं संकट उभं केलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका भारताला बसला आहे. कोरोना रोखण्यासाठी देशभरात लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. अद्याप कोरोनावर ठोस औषध उपलब्ध झालं नाही. मात्र, कोविड 19 च्या उपचारासाठी सीरम इन्स्टीट्यूटच्या कोव्हिशिल्ड लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्यानंतर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कंपनी जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी ठरली.

मागील वर्षी म्हणजे 2020 मध्ये कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घालण्यास सुरुवात केली. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी दिवसरात्र कष्ट करुन शास्त्रज्ञांनी लसीचा शोध लावला. कोरोनावर प्रत्यक्ष लस नसली तरी कोरोनाविरोधातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि हर्ड इम्युनिटी तयार करण्यासाठी याचा वापर करण्याचे निश्चित करण्यात आले. भारतात जानेवारी महिन्यामध्ये सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजूरी देण्यात आली.

सीरमच्या कोव्हिशिल्ड लसींची निर्यात जगभरातील अनेक देशांमध्ये होत आहे. या पार्श्वभूमीवर सीरमची कमाई किती आहे ? कंपनीचा निव्वळ नफा किती आहे ? हे जाणून घेण्याची प्रत्यकाला उत्सुकता आहे. कॉर्परेट कंपन्यांच्या व्यवहारासंदर्भात माहिती ठेवणाऱ्या कॅपिटलाइनने प्रकाशित केलेल्या नव्या अहवालानुसार सन 2019-20 मध्ये भारतातील 418 भारतीय कंपन्यांनी पाच हजार कोटी पेक्षा अधिक रकमेचा व्यापार केला आहे. यामध्ये सर्वाधिक नफा मिळवणाऱ्या कंपन्यांच्या यादीत सीरमचा पहिला क्रमांक लागतो.

सीरमने 5 हजार 446 कोटींच्या विक्रीच्या मोबदल्यात 2 हजार 251 कोटींचा निव्वळ नफा कमावला आहे. हा नफा नेट मार्जिनच्या 41.3 टक्के इतका आहे. सीरम ही कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टेड कंपनी नसल्याने योग्य माहिती मिळू शकत नाही, असे सांगण्यात येते. पाच हजार कोटींचा उद्योग करणाऱ्या कंपन्यांच्या यादीमध्ये 18 कंपन्या या औषध क्षेत्राशी संबधित आहेत. यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर मॅकलेओड्स फार्मास्युटीकल्सचा समावेश आहे. या कंपनीने 28 टक्के निव्वळ नफा कमावला आहे.

सीरमच्या नफ्याची टक्केवारी जास्त असण्यामागे मुख्य कारण आहे ते म्हणजे कंपनी भारतामध्ये लसीची निर्मिती करत आहे. जगामध्ये सध्या सर्वाधिक लसीची गरज भारताला आहे. त्यामुळे जगातील सर्वात मोठी औषधं निर्मिती करणारी सीरम ही सर्वाधिक नफा कमावणारी कंपनी ठरली आहे. सीरमची मालकी असणाऱ्या पुनावाला हॉर्स ब्रीडिंग, बांधकाम व्यवसाय, अर्थसहाय्य, हवाई क्षेत्र यामध्ये देखील चांगली गुंतवणूक केली आहे.

मागील वर्षी सीरमचा महसूल 23 टक्क्यांनी वाढून वार्षिक स्तरावर 4 हजार 630 कोटींवर पोहोचला आहे. तर निव्वळ नफा 28 टक्के वाढला होता. तो 12 हजार 191 कोटींवर पोहोचला. परंतु 2015-16 ते 2019-20 या कालावधीत कंपनीच्या महसुलामध्ये चार टक्क्यांनी घट झाली पण निव्वळ नफा कायम राहिला.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीची स्थापना डॉ. पूनावाला यांनी 1966 मध्ये केली होती. 1974 मध्ये सीरमने लहान मुलांच्या काही आजारांवर लस निर्मिती करण्यास सुरुवात केली. 1994 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेकडून एक्रेडेशन देण्यात आले. आताच्या घडीला सीरमकडून अनेक प्रकारच्या लसींची निर्मिती करण्यात येत आहे. कोरोना संकटात ऑक्सफर्ड विद्यापीठाने केलेल्या संशोधनानंतर सीरमने भारतात कोरोनावर प्रभावशाली ठरलेल्या कोव्हिशिल्ड लसीची निर्मिती करण्यास सुरुवात केली. सध्या ही कंपनी जगातील 100 हून अधिक देशांना या लसींचा पुरवठा करते.