तब्बल 2.75 कोटींच्या दागिन्यांवर चोरट्यांनी केला हात साफ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून चोरी करण्याच्या पद्धतीमध्येही बदल होताना दिसत आहे. नुकतीच ज्वेलर्सच्या दुकानात चोरी झाल्याची घटना घडली असून यामध्ये चोरटयांनी रस्त्यावरील वीज प्रवाह खंडित करून सीसीसीटीव्हीची मोडतोड करत तब्बल पावणे तीन कोटीच्या दागिन्यांवर हात साफ केला आहे. काळाचौकी येथे हि घटना घडली असून काळाचौकी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत याप्रकरणी गुन्हे शाखेनेही समांतर तपास सुरू केला आहे.

काळाचौकी येथील आंबेवाडी परिसरात मंगल ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. तक्रारदार सराफ हे शेजारील इमारतीत राहण्यास आहेत. सोमवारी सकाळी दुकानाचे शटर उघडे असल्याची माहिती मिळताच त्यांनी दुकानात धाव घेतली. रिकामी झालेले दुकान नजरेस पडताच त्यांना धक्का बसला. याबाबत पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. चोरट्यांनी दुकानातील, बाहेरील सीसीटीव्ही फोडले आणि डिव्हिआरही सोबत नेल्याचे दिसून आले.

दुकानासमोरील रस्त्यावर काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद होता. याचाच फायदा घेत त्यांनी दुकानात चोरी केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे चोरी करण्यापूर्वी चोरटयांनी रस्त्यावरील वीज प्रवाह खंडित केला. नंतर दुकानातील दागिन्यांवर हात साफ केला आहे. ओळखीच्या व्यक्तींसह परिसरातील अन्य सीसीटीव्हीद्वारे चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत