‘या’ कारणामुळे शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या मतदारसंघात केला नाही प्रचार

भोपाळ : वृत्तसंस्था-मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठीच्या  रणधुमाळीदरम्यान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ते निवडणूक लढवत असलेल्या बुधनी मतदारसंघात स्वत:च्या प्रचारासाठी एकही सभा घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे. या विधानसभा निवडणुकी दरम्यान यावेळी राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याचे जाणवते आहे. कारण  यावेळच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार आज संपुष्टात येत असल्याचे समजत आहे. काँग्रेस आणि भाजपा दोन्हीकडून तितकाच आक्रमक प्रचार पाहायला मिळाला. परंतु असे असले तरी एकीकडे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ते निवडणूक लढवत असलेल्या बुधनी मतदारसंघात स्वत:च्या प्रचारासाठी एकही सभा घेतली नाही. दुसरीकडे त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस उमेदवार अरुण यादव यांनी येथे प्रचाराची राळ उडवली असल्याचे चित्र दिसून आले आहे.

बुधनी येथील मतदार संघात  काँग्रेस उमेदवार अरुण यादव यांनी प्रचाराला चांगलाच जोर लावला आहे. बुधनी येथून शिवराज सिंह चौहान यांना आव्हान देणारे काँग्रेस उमेदवार म्हणजे अरुण यादव. राजकुमार पटेल हे काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळत असल्याचे समजत आहे. परंतु असेही समोर आले आहे की, काँग्रेसची स्थानिक संघटना यादव यांना पुरेशी साथ देत नाही. दरम्यान असे असतानाही मात्र अरुण यादव हे आपल्या विजयासाठी निश्चिंत आहेत असे दिसून येत आहे. शिवराज सिंह चौहान यांच्या किरार जातीपेक्षा या मतदारसंघात यादव मतदारांची संख्या दुप्पट आहे. त्यामुळे जातीय समीकरण जुळवून तसेच लोकांच्या नाराजीला हवा देऊन विजय मिळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. महत्त्वाचे म्हणजे शिवराज सिंह चौहान आणि अरुण यादव हे दोघेही ओबीसी समुदायातील आहेत.

1990 साली मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी येथून निवडणूक जिंकून विधानसभा गाठली होती. मुख्य म्हणजे 2008 आणि 2013 साली त्यांनी याच मतदारसंघामधून त्यांनी दणदणीत विजय मिळवला होता. याच विजयाच्या आधारावर यावेळीही सहजपणे निवडणूक जिंकण्याचा विश्वास शिवराज सिंह चौहान यांना आहे असे दिसत आहे. आणि याच कारणामुळे आपल्या मतदारसंघात फारसी शक्ती वाया न घालवता राज्यातील इतर भागांमध्ये प्रचार करण्याला चौहान यांनी प्राधान्य दिले आहे.

केवळ नामांकन भरण्यासाठी म्हणून शिवराज सिंह चौहान हे या मतदारसंघात आले होते. परंतु त्याआधी त्यांनी नर्मदा नदी आणि कुलदेवतेच्या दर्शनासाठी या भागाचा दौरा केला होता. आता शिवराज सिंह चौहान मंगळवारी येथे येण्याची शक्यता असून, ते गुरुवारपर्यंत थांबतील, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान येथील प्रचाराबाबत त्यांनी फारशी चिंता केलेली नाही असे दिसत आहे.