‘या’ कंपनीला मिळाला PM मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टचा ठेका, देशात लवकरच धावणार ‘बुलेट’ ट्रेन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पीएम मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट बुलेट ट्रेन योजनेसाठी 88 किलोमीटर अंतराच्या वायाडक्ट निर्मितीचा 7,289 कोटी रूपयांचा ठेका लार्सन अँड टुब्रो (एलअँडटी) ला मिळाला आहे. कंपनीने यासाठी निविदेत सर्वात कमी बोली लावली होती. देशात मुंबई-अहमदाबाददरम्यान 508 किलोमीटर अंतराच्या बुलेट ट्रेन योजनेचे काम सुरू आहे. नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) हा प्रोजेक्ट जपानच्या सहकार्याने करत आहे.

एलअँडटीने सर्वात कमी बोली लावली
एनएचएसआरसीएलने एका वक्तव्यात सांगितले की, वडोदरा आणि अहमदाबादच्या दरम्यान 88 किलोमीटरच्या वायाडक्टचे डिझाईन आणि बांधकामासाठी एलअँडटीने सर्वात कमी बोली लावली. या वायाडक्ट अंतर्गत आनंद/नाडियडमध्ये स्टेशन बांधण्याचा सुद्धा समावेश आहे. बोली आज उघडण्यात आल्या आणि त्यामध्ये एलअँडटीची बोली विजयी झाली. निविदाअंतर्गत एलअँडटीसह एकुण सात कंपन्यांनी समूह तयार करून बांधकामासाठी तीन बोली जमा केल्या होत्या.

यामध्ये एक समूह एफ्कॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर, रकॉन इंटरनॅशनल, जेएमसी प्रोजेक्ट्स, जे. कुमार इंफ्रा प्रोजेक्ट, एचएसआर होते. एनएचएसआरसीएलने एलअँडटीला योजनेंतर्गत 237 किलोमीटरच्या वापी ते वडोदराच्या वायाडक्ट बांधकामाचा पहिला ठेका अगोदरच दिलेला आहे. यामध्ये रेल्वे स्टेशन वापी, बिलमोरा, सूरत आणि भरूच आणि सूरतमध्ये ट्रेन डेपोच्या बांधकामाचा समावेश आहे. या ठेक्याचे मुल्य 24,985 कोटी रूपये आहे.