पत्रकारितेबद्दल ‘ही’ माहिती जी आजही क्वचितच लोकांना माहिती आहे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ( अक्षय पुराणिक ) – संसद, न्यायसंस्था व कार्यकारी सत्तेनंतर आपल्या लोकशाहीप्रधान देशाचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणा-या वृत्तपत्रांचा भारतात उगम झाला तो 1780 मध्ये. जेम्स ऑगस्टस हिकी यांनी ‘बेंगॉल गॅझेट’ या नावाने वृत्तपत्र सुरू करून भारतीय वृत्तपत्रसृष्टीचे जनकत्व पत्करले, तर मराठी वृत्तपत्रसृष्टीचा उगम होण्यास त्यानंतर तब्बल 48 वर्षांचा कालखंड लागला आणि 1832 मध्ये मराठी वृत्तपत्राचा जन्म झाला.
6 जानेवारी 1832 या दिवशी बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ या नावाने पहिले मराठी वृत्तपत्र सुरू करून मराठी वृत्तपत्रसृष्टीचा पाया रचला. म्हणूनच जांभेकरांना मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक म्हटले जाते. व्यासंगी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या जांभेकरांच्या जीवनक्रमाचा इतिहास म्हणजे दैदिप्यमान कारकीर्दीचा सोनेरी प्रकाशच होय. 1812 ते 1832 या कालावधीत त्यांनी आपल्या कर्तृत्त्वाची झलक विद्वान प्राध्यापक, ग्रंथकार व संपादक अशा विविध पैलूंनी दाखवून समाजातील अज्ञानरूपी अंधकार वृत्तपत्राच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न केला.
कोकणातील देवगड तालुक्यात असलेल्या पोंभुर्ले या गावी 1812 मध्ये जांभेकरांचा जन्म झाला. अवघ्या विसाव्या वर्षी, म्हणजेच 1832 मध्ये त्यांनी ‘दर्पण’ या नावाने मराठी भाषेत वृत्तपत्र सुरू केले. ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू झाले 6 जानेवारी 1832 रोजी ते प्रथम पाक्षिक म्हणून. 4 मे 1832 पासून मराठी, इंग्रजी अशा दोन्ही भाषांत हे वृत्तपत्र प्रकाशित केले जाई. दर्पण म्हणजे आरसा. सद्य:स्थितीचे खरेखुरे दर्शन वृत्तपत्राच्या माध्यमातून घडवून झोपलेल्या समाजाला जागे करणे हाच या नावामागील बाळशास्त्रींचा हेतू होता. यामुळेच ‘दर्पण’मधून मुलकी व न्याय खात्यातील अधिका-यांची माहिती, तसेच वैज्ञानिक घडामोडी, स्त्रीशिक्षण, विधवा पुनर्विवाह आदी सामाजिक प्रश्नांवर जहाल लिखाण झाल्याचे आढळते. प्रामुख्याने विधवा पुनर्विवाहाची चळवळच त्यांच्या लिखाणामुळे उभी राहिली. ज्ञानाचा प्रसार समाजाच्या तळागाळापर्यंत झाला पाहिजे आणि हे कार्य ‘दर्पण’च्या माध्यमातून केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते.
 1840 मध्ये त्यांनी ‘दिग्दर्शन’ हे पहिले मराठी मासिक सुरू केले. त्यांनी ‘बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी’चीही स्थापना केली. शिवाय नेटिव्ह इम्प्रुव्हमेंट सोसायटीदेखील स्थापन केली. या सोसायटीतूनच पुढे स्टुडंट लायब्ररी अँड सायंटिफिक सोसायटीचा जन्म झाला. दादाभाई नौरोजी आणि भाऊ दाजी लाड यांच्यासारख्या नेत्यांनी याच संस्थांपासून प्रेरणा घेतली. इंग्रज राजवटीतील गव्हर्नर सर जेम्स कर्नाक यांनी बाळशास्त्रींना ‘जस्टिस ऑफ द पीस’ अशी पदवी दिली, हेच ‘दर्पण’चे यश मानले जाते. ‘दर्पण’मध्ये वाचकांना महत्त्वाचे स्थान दिले जात होते. वाचकांना मुक्तपणे मनोगत मांडता यावे, यासाठी विशेष प्राधान्य दिले जात असे. विशेष म्हणजे स्तुती करणारी पत्रे यात कधीच छापली जात नव्हती.
त्या काळची परिस्थिती, एकूण साक्षरतेचे अत्यल्प प्रमाण व वृत्तपत्रासारख्या नवीन उपक्रमाला पैसे खर्च करून वाचणारे तर अगदीच कमी, तरीही त्या काळी ‘दर्पण’ समाजातील लोकांना आपलेसे वाटत होते. त्याचा खप चांगला होता.
आर्थिक पाठबळ नसल्यामुळे एखादे वृत्तपत्र बंद पडण्याची प्रथा मराठीतील या पहिल्याच वृत्तपत्रापासून पडली. ‘दर्पण’ आठ वर्षे चालले. 26 जून 1840 रोजी शेवटचा अंक प्रसिद्ध झाला आणि नंतर ते बंद झाले. लोकशिक्षण व समाज प्रबोधन या उद्देशाने सुरू केलेल्या ‘दर्पण’चे कार्य उल्लेखनीय असून आधुनिक वृत्तपत्रसृष्टीला आदर्श ठरावे असेच आहे. बाळशास्त्री जांभेकर हे थोर पत्रकारमहर्षी अल्पायुषी ठरले, पण त्यांनी आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस समाजकार्यासाठीच खर्ची घातला. 17 मे 1846 रोजी त्यांचे निधन झाले आणि 35 वर्षांच्या अल्पशा कारकीर्दीला पूर्णविराम मिळाला. म्हणूनच 6 जानेवारी हा दिवस मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचा समजला जातो, पत्रकार दिन म्हणून पाळण्यात येतो.
मराठी वृत्तपत्राचा पाया उभारणा-या बाळशास्त्रींची पत्रकारिता समाज प्रबोधन व लोकशिक्षणाचे ज्ञान देणारे एक विद्यापीठ होते. आधुनिक युगात माहिती तंत्रज्ञान विकसित झाले, कालांतराने पत्रकारिता क्षेत्रात मोठे बदल झाले. टी.व्ही. मीडियाच्या काळात वृत्तपत्रांना आपले अस्तित्व टिकवण्यासाठी विविध पैलूंचा वेध घ्यावा लागत आहे. देशाला आज भ्रष्टाचार, लोकसंख्या वाढ, बेरोजगारी, महागाई अशा विविध गंभीर समस्यांनी ग्रासलेले असताना एक वैभवसंपन्न, बलशाली भारत निर्माण करण्याचे मोठे आव्हान पत्रकारिता क्षेत्रापुढे उभे आहे.
 आधुनिक पत्रकारिता कशी आहे, हा एक संशोधनाचा विषय ठरेल. तथापि ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू करणा-या बाळशास्त्री जांभेकरांना आधुनिक युगात मोठ्या अभिमानाने ‘दर्पण’कार ही पदवी बहाल करण्यात आली आहे. अर्थात ‘दर्पण’पूर्वीही काही अनियतकालिके मराठीतून प्रसिद्ध झाल्याचे मानले जाते, परंतु अधिकृत नोंद असलेले ‘दर्पण’ हेच पहिले मराठी पत्र मानले जाते. त्याच्या प्रतींच्या प्रतिकृती आजही उपलब्ध आहेत.
मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ हे बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले. दिवस बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म दिनही आहे. या दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो.
बाळशास्त्री हे इंग्रजी राजवटीतील एक विद्वान व्यक्तिमत्व म्हणून विखय्त होते. बालपणी घरीच मराठी व संस्कृत भाषांचा अभ्यास केलेल्या बाळशास्त्रींनीं सन १८२५ मध्ये मुंबई येथे सदाशिवबापू छत्रे आणि बापूशास्त्री शुक्ल यांच्याकडून संस्कृत आणि इंग्रजीचे शिक्षण घेतले. गणित आणि आधुनिक विज्ञान या विषयातही ते पारंगत होते. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी सन १८३४ मध्ये एल्फिन्स्टन महाविद्यालयात पहिले भारतीय व्याख्याते म्हणून जांभेकरांची नियुक्ती झाली..
बाळशास्त्रींना मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन व ग्रीक या भाषांचे ज्ञान होते. फ्रेंच भाषेतील नैपुण्याबद्दल फ्रान्सच्या राजाकडून त्यांचा मानसन्मान झाला. त्यांनी प्राचीन लिप्यांचा अभ्यास करून कोकणातील शिलालेख व ताम्रपट यांचे शोधनिबंध लिहिले. मुद्रित स्वरूपातील ज्ञानेश्वरी त्यांनीच प्रथम उपलब्ध करून दिली. कुलाबा वेधशाळेच्या संचालकपदीही त्यांची नियुक्ती करण्यात आली. रसायनशास्त्र , भूगर्भशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, न्यायशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र अशा विविध विषयांचे बाळशास्त्री यांना ज्ञान होते.
एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये अध्यापन करीत असताना समाजाकडे सजगतेने पाहणाऱ्या बाळशास्त्रींना अनेक समस्या दिसून येत. पारतंत्र्य, अनिष्ट रूढी, चालीरीती, अज्ञान, दारिद्र्य, अंध:श्रद्धा होणाऱ्या समाजाच्या अधोगतीमुळे त्यांना चिंता वाटत असे. या सर्व समस्यांमधून मार्ग दाखविण्यासाठी प्रबोधनाची आवश्यकता त्यांना जाणवली. त्यासाठी गोविंद कुंटे आणि भाऊ महाजन यांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले.
६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’चा पहिला अंक प्रकाशित झाला. जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ‘दर्पण’ आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आले. त्याचवेळी इंग्रजी सत्ताधाऱ्यांना स्थानिकांच्या अडचणी आणि भावना कळाव्या यासाठी ‘दर्पण’मध्ये एक स्तंभ इंग्लिश भाषेत लिहिला जात असे. वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी सर्वसामान्यांमध्ये रुजलेली नसल्याने ‘दर्पण’ला सुरुवातीला मोठ्या संख्येने वर्गणीदार मिळाले नाहीत. मात्र ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. ‘दर्पण’ साडे आठ वर्षे चालले आणि जुलै, १८४० मध्ये त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.
‘दर्पण’ या दैनिक वृत्तपत्रासोबत मराठीतील पहिले मासिक ‘दिग्दर्शन’ त्यांनी १८४० साली सुरू केले. त्याचे स्वरूप शैक्षणिक होते. ‘दिग्दर्शन’ मधून ते आधुनिक भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, व्याकरण, गणित तसेच भूगोल व इतिहासावर लेख प्रकाशित करत. भाऊ दाजी लाड, दादाभाई नौरोजी हे महारथी त्यांचे विद्यार्थी होते. ‘दिग्दर्शन’च्या कामात त्यांची मदत होती. या मासिकाचे संपादक म्हणून बाळशास्त्रींनी ५ वर्षे काम पाहिले. या मासिकाच्या माध्यमातून त्यांनी लोकांची आकलनक्षमता वाढवण्याचा प्रयत्‍न केला.