कारागृहातून विशेष पोलीस महानिरीक्षकांना जीवे मारण्याची धमकी

बेळगावः पोलीसनाना आॅनलाईन

उत्तर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक अलोककुमार यांना कारागृहातूनच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हिंडलगा कारागृहातील चाैघांना एपीएमसी पोलिसांनी अटक केली असून, जयेश ऊर्फ जयेशकांत (वय 30, रा. अड्डीहोळे सिरीबागीलू, ता. पुत्तूर, केरळ), गौतमचंद्र बी. विजेंद्रनाथ (31, रा. हरिहर, मंगळूर), बी. डी. रामचंद्रय्या (40, रा. गोपालमयी, कोप्पळ), अरविंद नारायण पुजारी (36, रा. शिवमोग्गा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबात सविस्तर वृत्त असे की, उत्तर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक अलोककुमार यांना त्यांच्या सरकारी मोबाईलवर दिनांक 21 एप्रिल रोजी रात्री 9.15 च्या दरम्यान फोन करुन एका अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच धमकीचा एसएमएसही मोबाईलवरून आला होता. याबाबत मंगळवार ( दि.24 एप्रिल) रोजी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करण्यात आली होती. ज्या मोबाईल फोनवरुन धमकी देण्यात आली त्या मोबाईल (7090914584) क्रमांकाची पडताळणी केली असता, सदरचा काॅल हिंडलगा कारागृहातून आल्याची माहिती समोर आली. कारागृहातील कैद्यांकडून देण्यात आलेल्या धमकीची गांभिर्याने दखल घेत पोलिसांनी संबधीत आरोपींना चाैकशीसाठी ताब्यात घेण्यासाठी दिनांक 30 एप्रिल रोजी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने संबंधीत व्यक्तीच्या चाैकशीला संमती दिली होती. त्यानुसार शनिवार (दि.5 मे) रोजी एपीएमसी पोलिसांनी चाैंघांना अटक केली.

कारागृहातील अधिकारी देखील चाैकशीच्या रडारवर?

कारागृगामध्ये कार्यरत असलेले अधिकारी देखील चाैकशीच्या रडारवर आहेत. सदर कैद्यांकडे आढळलेला मोबाईल फोन कोणत्या माध्यमातून कारागृहात आला. तसेच कोणाच्या सांगण्यावरुन व कोणत्या कारणावरुन आयजीपींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याची कसून चाैकशी करण्यात आली आहे. याप्रकरणी कारागृहातील अधिकाऱ्यांचीही चाैकशी होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.