पिंपरी विधानसभा मतदारसंघावर 3 पक्षांचा दावा

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजप-शिवसेना युती झाली नसली तरी युतीचे मित्र पक्ष असलेल्या आरपीआयने या मतदारसंघावर दावा केला आहे. विद्यमान आमदार शिवसेनेचे असल्याने या जागेवर विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांनी दावा केला आहे. तर हा मतदारसंघ राखीव असल्याने या ठिकाणी भाजपच्या इच्छूकांनी देखील जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यामुळे युती झाली तर या मतदारसंघावरून युतीची डोकेदुखी वाढणार आहे.

मागील निवडणुकीमध्ये भाजप-आरपीआय युती होती. त्यावेळी भाजपने आपला उमेदवार उभा न करता ही जागा आरपीआयसाठी सोडली होती. तसेच राज्यात अन्य सात जागाही सोडल्या. त्या आठही मतदारसंघापैकी सर्वाधिक 48 हजार मते पिंपरी मतदारसंघाच्या उमेदवार चंद्रकांता सोनकांबळे यांना मिळाली होती. या निवडणूकीत सोनकांबळे यांचा फक्त तीन हजार मतांनी पराभव झाला होता.
आगामी विधानसभा निवडणूकीत आरपीआयने दहा जागांची मागणी केली आहे.

त्यामध्ये पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. सध्या ही जागा शिवसेनेकडे असल्याने या जगाबाबत तिढा निर्माण झाला आहे. ताब्यातील जागा शिवसेनेने सोडण्यास तयार नाही तर आरपीआयचा आग्रह कायम आहे. तसेच भाजपच्या इच्छूकांची मोठी संख्या आहे. परंतु भाजपने मित्र पक्ष म्हणून ही जागा आरपीआयला सोडावी अशी कार्यकर्त्यांची आग्रही मागणी आहे.

भाजप-शिवसेना युती न झाल्यास किंवा युतीच्या जागावाटपात पिंपरी मतदारसंघ भाजपकडे आल्यास निवडणूक लढवण्याठी इच्छूकांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. यामध्ये चंद्रकांता सोनकांबळे, खासदार अमर साबळे यांची कन्या वेणू, नगरसेविका सीमा सावळे यांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादीकडून सुलक्षणा धर यांनी विधानसभेची तयारी सुरु केली आहे.

You might also like