देशभरात पुन्हा कडक Lockdown लागणार का? तर तज्ज्ञ म्हणतात…

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचे थैमान अद्याप सुरुच आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात दिवसाला 3 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा देशभरात कडक लॉकडाऊन लागू केला जाईल, अशा चर्चा सुरु आहेत. त्यानंतर आता तज्ज्ञांनी यावर भाष्य केले.

देशातील विविध राज्यांत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू केला आहे. मात्र, तरीही अनेक राज्यांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. कोरोनाविरोधात लढण्यासाठी जो वेळ हवा आहे, तो लॉकडाऊनमुळे मिळतो. आता ऑक्सिजनची दुप्पट मागणी वाढली आहे. कर्नाटकमध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे. हा मोठा संकेत आहे. लॉकडाऊनच्या काळात लसीकरण मोहिमेचा वेग कमी होऊ शकतो. त्यामुळे रणनीतीमध्ये बदल केला पाहिजे, असे कर्नाटक कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. विशाल राव यांनी सांगितले.

कंटेन्मेंट झोनवर लक्ष द्यावे

देशव्यापी लॉकडाऊन हा पर्याय आहे असं वाटत नाही. कंटेन्मेंट झोनही आपण यशस्वी करू शकलो नाही. लॉकडाऊन शहर आणि जिल्हास्तरावर ठिक आहे. कोरोना रुग्णांचे आकडे कसे कमी होतील याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. व्हायरस पसरत असताना तो रोखण्याचा मार्ग आपल्याला माहीत नाही. लॉकडाऊनमुळे केवळ कोरोना रुग्णांच्या संख्येला आवर घालता येईल. पण कंटेन्मेंटमुळे खूप मदत होईल, असे पीएचएफआय बंगळुरूचे प्राध्यापक गिरीधर बाबू यांनी म्हटले आहे.

लोकल लॉकडाऊन गरजेचा

कोरोना व्हायरसच्या सुरुवातीच्या काळात देशव्यापी लॉकडाऊन होता. त्यावेळी रुग्णसंख्या कमी होती. लॉकडाऊन करण्याचीही एक पद्धत आहे. मात्र, सरकारकडे लोकांना दिलासा देण्याचा दुसरा पर्याय नाही. लोकल लॉकडाऊनमुळे कोरोनाची साखळी तोडली जाईल. यावर विश्वास ठेवायला हवा, असे मुंबईच्या केअर रेटिंग्सचे चीफ इकनॉमिस्ट मदन सबनवीस यांनी सांगितले.

लॉकडाऊनचा उपयोग होणार नाही

देशव्यापी लॉकडाऊन लावल्याने काही उपयोग होणार नाही. ज्या ठिकाणी कोरोनाची संख्या अधिक आहे. त्या ठिकाणी निर्बंध असले पाहिजे. देशव्यापी लॉकडाऊन केल्याने काय परिस्थिती निर्माण झाली होती. हे आपण पाहिले आहे. त्यामुळे लोकांच्या रोजी रोटीकडेही लक्ष दिले पाहिजे. लॉकडाऊनचा थेट परिणाम रोजंदारी करणाऱ्या कामगारांवर पडतो, असे दिल्लीचे डॉ. शाहीद जमील यांनी सांगितले.