बीडमध्ये त्यांचे डिपॉजिट जप्त करणार

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेचा समारोप परळीमध्ये करायला, परळी महाराष्ट्राची राजधानी आहे काय. असे केले तर बीडमध्ये याचे डिपॉजिट जप्त करणार ! असे म्हणत भाजप नेत्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर टीकेचे संधान साधले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांचा आगामी निवडणुकीच्या निमित्ताने मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात पंकजा मुंडे बोलत होत्या.

महाराष्ट्रात भाजपचे सर्वाधिक खासदार निवडून द्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला झेंडा सुद्धा फडकवण्याची संधी मिळू देऊ नका असे म्हणत पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन केले. बीड लोकसभेसाठी भाजपने विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादीच्या वतीने अमरसिंह पंडित यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत राष्ट्रवादी आहे.

काँग्रेस आघाडीच्या विरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी छाती ताणून उतरले पाहिजे आणि केंद्र सरकारने देशातील जनतेसाठी केलेली कामे लोकांपर्यत तुम्ही पोचवावी. कारण नेत्यांच्या विजयाचे शिल्पकार तुम्ही कार्यकर्तेच असतात असे पंकजा मुंडे यांनी म्हणले आहे. निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा मुंडे भाऊ बहिणीमध्ये राजकीय कलगीतुरा रंगण्याची शक्यता आता स्पष्ट दिसते आहे.