आरक्षणाच्या टक्केवारीसाठी ओबीसी समाज आक्रमक, आज आंदोलन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सराकरने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण सरकारने देवू केल्याने त्याचा परिणाम ओबीसी आरक्षणाच्या टक्केवारीवर होणार आहे. ५२ टक्के ओबीसींना आजही पुरेसे आरक्षण नाही, त्यामुळे सरकारला विरोध दर्शवण्यासाठी ओबीसी संघर्ष समन्वय समिती आज आक्रोश धरणे आंदोलन करणार आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातील सर्व ओबीसी संघटना सामील होणार आहेत. तसेच युवावर्गही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे.

मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षण हे २७ टक्क्यांवरून आता एकोणीस टक्क्यांवर आणले आहे, त्यात जातनिहाय जनगणना न करता मराठा समाजाला एकतर्फी सोळा टक्के आरक्षण देणे ही ओबीसी वर्गाची फसवणूक असल्याची भूमिका ओबीसी संघटनांनी घेतली आहे. ओबीसीसह सर्व जातींची जातनिहाय जनगणना करून त्यानंतर आरक्षण द्यावे तसेच आरक्षणाची मर्यादा वाढवावी, अशी भूमिका ओबीसी संघटनांनी घेतली आहे.

या आंदोलनामध्ये कुणबी समाजोन्नती संघ, अखिल भारतीय भंडारी महासंघ, आगरी-कोळी शेतकरी प्रबोधनी, कुणबी युवा मुंबई, तेली समाज संघटना, धनगर समाज संघ अशा विविध संघटना सहभागी होणार आहेत. सरकारने कुणाच्या दबावाला बळी न पडता ओबीसींना न्याय द्यावा व आरक्षणामध्ये छुप्या मार्गाने होणारी घुसखोरी रोखावी, यासाठी हे आक्रोश आंदोलन आहे असे आवाहन ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष चंद्रकांत बावकर, सरचिटणीस राजाराम पाटील व कुणबी युवाचे अध्यक्ष माधव कांबळे यांनी केले आहे.

Loading...
You might also like