तौसिफ शेखची आत्महत्या नाही, तर हत्या : मुंडे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – तौसीफ शेख यांची आत्महत्या नसून हत्या केली आहे. या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली यांची चौकशी करावी. शेख यांच्या मृत्यूस कर्जत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिसप्रमुख, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार ,पोलीस निरीक्षक जबाबदार आहेत, असा खळबळजनक आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे यांनी आज केला.
मुंडे यांनी आज मयत तौसिफ शेख याच्या नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर बोलताना मुंडे म्हणाले की, अधिका-यांच्यामुळे तौसिफचा बळी गेला अाहे. या सर्वांवा तात्काळ निलंबित करून त्यांच्याविरुद्ध 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करावा.
तौसीफ शेख या युवकाने समाजासाठी आणि त्यांच्या धर्माच्या जागेसाठी बलीदान दिले आहे. ही घटना घडून आज पाच दिवस झाले तरी या मतदार संघाचे आमदार असलेले मंत्री फिरकले नाहीत. आम्ही येणार असल्याचे समजल्यावर ते दौ-यामध्ये बदल करून धावत पळत भेट देतात. स्थानिक आमदार पालकमंत्री आहेत. त्यांच्याच मतदार संघात एवढी मोठी घटना घडल्यानंतरही त्यांना या कुटुंबियास भेट देण्यास वेळ मिळत नाही. याचाच अर्थ त्यांच्या पाठींब्यामुळे प्रशासनाने तौसिफच्या मागणीकडे दुर्लक्ष केले नाही का, असा प्रश्न उपस्थित होतो.
जिल्हाधिकारी यांना निवदेन देवून एक युवक आत्मदहन करताे. त्याला वेळवर उपचार मिळत नाहीत. जिल्हाधिकारी तिथे असूनही ते बाहेर येत नाहीत. यावरून ते किती अंसवेदशिल आहेत, हे दिसून येते. त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज असताना अपर जिल्हाधिकारी चौकशीसाठी नियुक्त करतात. कसले सरकार आहे ही तर सामूहिक हत्या दडपण्याचा प्रकार आहे. मात्र आम्ही हे होऊ देणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही या न्यायासाठी संघर्ष करू, असेही मुंडे म्हणाले.
‘कार्यकर्त्यांवर दडपशाही करू नका’
पोलीस आधिका-यांनी कार्यकर्त्यांना विनाकारण कोणाचे एेकून दडपशाही करू नये. तसे केल्यास आम्हाला जशास तसे उत्तर देता येते हे पण लक्षात ठेवा. आम्ही या बाबत विधानपरिषदेमध्ये आवाज उठवणार असून, निवृत्त न्यायाधाशांमार्फत या प्रकरणाची नि:पक्ष चौकशी करावी, अशी मागणी मुंडे यांनी केली.
‘सीआयडी’मार्फत चौकशी करा: विखे
तौफिक शेख यांच्या मृत्यूची घटना गंभीर स्वरूपाची आहे. अनेक शासकीय अधिकारी या मृत्यूस जबाबदार आहेत. त्यामुळे शेख यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी किंवा सीआयडी नियुक्त करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. त्यांनीही आज मयत शेख यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.