पुणेकरांनो सावधान! तुम्हालाही भरावा लागेल दंड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे आणि पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेकडून मागील दहा दिवसात विशेष कारवाई मध्ये ७६ लाख ६० हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. पुणे,पिंपरी-चिंचवड परिसरातील वाढत्या अपघाताचे प्रमाण पाहता वाहतूक सुरळीत व सुरक्षित होण्यासाठी वाहतूक शाखेने विशेष मोहिमेचे आयोजन केलेले आहे.

ही मोहीम वाहतुकीच्या विविध कलमांतर्गत रस्ता सुरक्षा अभियान २०१८ च्या अनुषंगाने सुरु आहे. दि. २३/०४/२०१८ ते ०३/०५/२०१८ पर्यंत या मोहिमे अंतर्गत तब्बल १८ हजार ८१६ जणांवर कारवाई करण्यात आली असून यामधून ७६ लाख ६० हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. कारवाईमध्ये जादा प्रवासी वाहतूक,अवैध प्रवासी वाहतूक, डी.डी.कारवाई, मोबाईल वर बोलणे, सीट बेल्ट, विना हेल्मेट, भरधाव वेग, ट्रिपल सीट अशा कारवायांचा समावेश आहे.

ही मोहीम सुरूच राहणार असून, पुण्यातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्याकरिता वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन करून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक शाखेकडून नागरिकांना करण्यात आले आहे.