‘आरसा’ नसलेली गाडी चालवताय तर मग आता होईल दंड, जाणून घ्या

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – विना आरसे, कागदपत्रे, विमा पॉलिसी सोबत नसणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) दिले आहेत. तर विना आरसे वाहन चालवल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे आरटीओकडून सांगण्यात आले.

सुरक्षित वाहतुकीसाठी वाहनांच्या दोन्ही बाजुंना आरसे असल्यास, मोटार आणि रिक्षाचालकांना त्याचा फायदा होतो. मात्र, नवीन पिढी स्टायलिश राहण्याकडे भर देत असल्याने शहरातील मोपेड व मोटारसायकलला अपवादात्मकच आरसे दिसून येतात. वाहतूक नियम मोडणाऱ्यांविरुद्ध यापुढे शहर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे.

दोन दिवसांत ४१ वाहने जप्त
आरटीओकडून महामार्गवरील तीनचाकी, चारचाकी व इतर मालवाहतूक वाहनांवर कारवाई केली जाते, असा गैरसमज निर्माण झाला असून, आता वाहनांचा नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवरही कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्याचीच झलक म्हणून दोन दिवसांत ४१ वाहनांना जप्त करण्यात आले आहे. विनावाहन परवाना, विना कागदपत्रे, विमा पॉलिसी, फॅन्सी नंबर प्लेट, मोबाइलवरून बोलत वाहने चालवणे, आरसे नसणे यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.

वाहनधारकांकडे ‘हे’ आवश्यक
वाहन चालवण्याचा परवाना, वाहनांची कागदपत्रे, विमा पॉलिसी, पीयूसी प्रमाणपत्र, वाहनांच्या दोन्ही बाजूचे आरसे

दंडाचे स्वरूप
>> विना विमापॉलिसी वाहन – चालक, मालकांसाठी : २००० रुपये दंड
>> विना पोलीस वाहन चालवणाऱ्या त्रयस्तास : २३०० रुपये दंड
>> विना आरसा वाहन : ५०० रुपये दंड