हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांना माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहातर्फे श्रध्दांजली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देशातील पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांच्या निधनानंतर माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहातर्फे एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, प्रा.डॉ. मंगेश तु. कराड व राहुल विश्वनाथ कराड यांनी त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली.

यावेळी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ लातूर येथील रूई रामेश्वर व पंढरपूर येथील वाखरीत होणार्‍या कुस्तीस्पर्धांच्या वेळी वस्ताद पै.श्रीपती खंचनाळे हे आवर्जून उपस्थित राहत व कुस्तीगीरांना प्रोत्साहन देत असत. त्यांनी अनेक राष्ट्रीय पातळीवरील नामांकित पैलवान घडविले आहेत. त्यांच्या जाण्याने केवळ आमच्या संस्थेचीच नव्हें तर एकंदर कुस्ती क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.”

“ 1959 मध्ये ते भारतातील पहिले हिंद केसरी ठरले. हिंद केसरी हा चीतपट कुस्तीने ठरला पाहिजे हे त्यांचे मत राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी उचलून धरले. अखेर चीतपट कुस्तीत ते विजयी ठरले. त्यांना राष्ट्रपतींकडून मानाची गदा व पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडून मानाचा फेटा मिळाला. त्यानंतर त्यांनी अनेक पैलवानांशी कुस्ती केली व विजय मिळविले. ”यावेळी एमआयटी शिक्षण समूहातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व सेवक वर्गांनी त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.