देशात ‘कोरोना’ लसीकरणाची तयारी; पहिल्या टप्प्यात देणार आरोग्य कर्मचार्‍यांना लस

बेंगळुरू : पोलीसनामा ऑनलाइन  –   कोरोना विषाणूमुळे आता देशात लसीकरणाचे वारे वाहू लागलेत. केंद्र सरकार आपल्या स्तरावर मोठी योजना तयार करतंय. एका लसीकरण केंद्रावर 5 कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. तसेच लस टोचल्यानंतर त्या व्यक्तीला अर्धा तास निरिक्षणाखाली ठेवले जाणार आहे. यासाठी वेगळी खोली तयार केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचार्‍यांना लस देण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने राज्यांना ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर’चा ड्राफ्ट पाठविला असून यात लसीकरणाबाबत करावयाची तयारी नमूद केली आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर एका दिवसात 100 लोकांना लस टोचली जाणार आहे. तसेच यानंतर वेग वाढविण्यासाठी समाज भवन, टेंट आदी लावले जाणार आहेत. प्रत्येक ठिकाणी लसीकरण केंद्रांना मोठ्या जागेची गरज भासणार आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाला ही माहिती दिली आहे. या एसओपीनुसार लसीकरण केंद्रावर एक गार्डसह 5 लोक असणार आहेत. 3 खोल्या वेटिंग, लसीकरण आणि निरिक्षणासाठी उभारले जाणार आहे.

लस टोचून घेणार्‍या प्रत्येक व्यक्तीला कोणताही दुष्परिणाम दिसून येतो का? हे पाहण्यासाठी 30 मिनिटे निरिक्षणाखाली ठेवले जाणार आहे. गंभीर परिस्थिती असल्यास त्याला करार केलेल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येईल.

केंद्राच्या एका दिवसाच्या वर्कशॉपमध्ये सहभागी झालेल्या आरोग्य अधिकारी डॉ. रजनी एन यांनी सांगितले की, लसीकरणासाठी 3 खोल्यांच्या उभारणीचा निर्णय हा सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी घेतला आहे.

एका व्यक्तीला प्रवेश

लसीकरणासाठी खोलीत एकावेळी एकाच व्यक्तीला प्रवेश दिला जाणार आहे. वेटिंग आणि निरिक्षणाच्या खोलीत काही लोकांना बसण्याची व्यवस्था केली जाईल. काही देशांत वेगवेगळ्या कोरोना लसीला आपत्कालीन लसीकरणाची परवानगी दिली आहे. भारतातही तीन कंपन्यांनी लसीकरणाची परवानगी मागितली आहे. यात प्रामुख्याने फायझर, सिरम आणि भारत बायोटेक यांच्या लसींचा समावेश आहे.

नवीन वर्षामध्ये कोरोना लस येण्याचे संकेत आहे. त्यानुसार शासन, प्रशासनाने लसीकरणाचे नियोजन केले आहे. मतदानाप्रमाणे बूथ तयार केले जाणार असून, तेथे कोरोनाची लस दिली जाणार आहे.

लस दिल्यानंतर संबंधित व्यक्तींचा मोबाईलवर संदेश येईल आणि क्यू.आर.कोड असलेले प्रमाणपत्र पाठविले जाणारआहे. त्याकरिता जिल्हास्तरावर ’टास्क फोर्स’चे गठन केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचार्‍यांना लस देण्यात येणार आहे.