माझ्याविरोधात महाभियोग आणल्यास अमेरिका कंगाल होईल : ट्रम्प

वॉशिंगटन : वृत्तसंस्था

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोग आणला जाणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. अमेरिकेत याबाबत चर्चा सुरू असताना यासंबंधी ट्रम्प यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना धक्कादायक इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, जर असे पाऊल उचलले गेले तर प्रत्येक जण कंगाल होईल. एका अमेरिकन वृत्त वाहिनीने ट्रम्प यांचे हे वक्तव्य प्रसारित केले आहे.

ट्रम्प म्हणाले, महाभियोगासारख्या कोणत्याही निर्णयाने बाजारात मोठी पडझड होईल. एवढेच नाही, तर यामुळे प्रत्येक जण कंगाल होईल. एखादे महान कार्य केलेल्या व्यक्तीवर आपण महाभियोग कसा आणू शकता, हे मला माहित नाही. मात्र, माझ्याविरोधात महाभियोग आलाच, तर  माझ्यामते बाजार धाडकन कोसळेल आणि प्रत्येकजण कंगाल होईल.

[amazon_link asins=’B077PWBC7J,B0784D7NFX,B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’108d9c4b-a76d-11e8-ba60-3373c122a7fc’]

ट्रम्प यांनी आपणास अमेरिकी वित्त कायद्याचे उल्लंघन करून मोठा गुन्हा करण्याची सूचना दिली होती, अशी कबुली त्यांचे माजी अधिवक्ता मायकल कोहेन यांनी मंगळवारी दिली होती. त्यामुळे पुढील काही महिन्यांत ट्रम्प यांना महाभियोगाचा सामना करावा लागू शकतो, असे त्यांच्या निवडणूक मोहिमेचे माजी सल्लागार मायकल कॅपुटो यांनी म्हटले होते. त्यावर ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया दिली.

फसवणूक, बँकांना खोटी माहिती देणे व प्रचार मोहिमेत आर्थिक उल्लंघनासह आठ आरोपांची कोहेन यांनी कबुली दिली असल्याचे कॅपुटो यांनी म्हटले आहे. जर मध्यावधी निवडणुकी दरम्यान डेमोक्रेट्सला संसदेत बहुमत मिळाले तर राष्ट्रध्यक्षांविरोधात महाभियोग चालवण्यासाठी आरोपांची ही कबुली पुरेशी आहे, असेही त्यांनी नमूद केले होते.