‘कोरोना’च्या संसर्गामुळे विश्वस्तांचा निर्णय ! नीरा-पाडेगांव येथील दत्तजयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द

नीरा : पोलिसनामा ऑनलाइन  – पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या पुरंदर आणि खंडाळा तालुक्यातील नीरा नदीकाठावरील प्रसिद्ध श्री. क्षेत्र मंदीरात कोरोना संसर्गामुळे मंगळवारी (दि.२९) दत्त जयंती उत्सवा निमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती श्री.दत्त सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रदीप काकडे यांनी दिली.

नीरा -पाडेगांव येथील दत्त मंदीराच्या कार्यालयात सोमवारी (दि.२१) सकाळी अकरा वाजता विश्वस्त मंडळाची बैठक पार पडली. त्या बैठकीत कोरोनाच्या संसर्गामुळे उत्सव साजरा करण्याबाबत शासनाने घातलेल्या निर्बंधामुळे यंदा
दत्त जयंती उत्सवानिमित्त होणारे सर्व कार्ययक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी, श्री.दत्त सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रदीप काकडे , उपाध्यक्ष जनार्दन दानवले, खजिनदार नितीन कुलकर्णी, सचिव व्यंकट धायगुडे, पोलिस काँन्स्टेबल फैय्याज शेख, यांच्यासह पुजारी सचिन घोडके, समीर पाळधीकर, हरिभाऊ कुलकर्णी, आनंद देशपांडे आदी उपस्थित होते.

यावेळी नितीन कुलकर्णी म्हणाले कि, माऊलींच्या पालखी सोहळ्यादरम्यान नीरा- पाडेगांव
येथील नीरा नदीच्या काठावर असलेल्या प्रसिद्ध दत्तमंदीराच्या घाटावर माऊलींच्या पादुकांना नीरा नदीच्या पवित्र तीर्थांनी स्नान घातले जाते. तसेच या दत्तमंदीरात नीरा ,पाडेगांव परिसरातील हजारो भाविक दत्तजयंती निमित्त दर्शनासाठी येत असतात. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे विश्वस्त ,पुजारी यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पाडले जाणार आहे.

दरम्यान, मंगळवारी (दि.२९) दत्तजयंती निमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने भाविकांनी दत्त मंदीर व परिसरात गर्दी करू नये असे आवाहन नितीन कुलकर्णी यांनी केले.

**** गर्दी न करण्याचे लोणंद पोलिसांचे आवाहन****

कोरोनाच्या संसर्गामुळे शासनाने उत्सवावर निर्बंध घातलेले असल्याने श्री.दत्तसेवा मंडळाच्या विश्वस्तांनी यंदा दत्तजयंती उत्सवानिमित्त सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. तसेच पाच ते दहा लोकांमध्ये विधिवत धार्मिक विधी पार पडणार आहेेे. तरी पुणे व सातारा जिल्ह्यातील भक्तांनी दत्त मंदीर परिसरात गर्दी करू नये व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन लोणंद पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी यांनी केले आहे.