न्यायाधीशांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

कळंबः पोलीसनामा आॅनलाईन

संदिप बारकुल

न्यायाधीशाच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कळंब येथील न्यायालय परिसरात घडली. याप्रकरणी न्यायाधीश आनंद सोपानराव मुंढे (वय-44, रा. न्यायालय निवास परिसर कळंब) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आकाश चोंदे (रा. कळंब) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चक्क न्यायालयाच्या आवारातच न्यायाधीशास गाडी अंगावर घालून चिरडण्याचा प्रयत्न केल्यामुळे शहराच एकच खळबळ उडाली आहे.

न्यायाधीश आनंद मुंढे हे आपले मुळ गाव कण्हेरवाडी येथून परत आल्यानंतर न्यायालय परिसरात रात्री 8 च्या दरम्यान पहारेकरी घुगे याच्याशी बोलत असताना एक इंडिका गाडी भरधाव वेगाने न्यायालय परिसरात घुसली. त्यावेळी संबधीत गाडी चालकाला आपण या ठिकाणी का आलात, तसेच तुम्हाला कोण पाहिजे अशी विचारणा केली असता गाडी चालकाने मुंढे यांच्या अंगावर गाडी घालून चिरडण्याचा प्रयत्न केला. वेळीच प्रसंगाचे गांभिर्य अोेळखता मुंढे यांनी बाजूला धाव घेतल्यामुळे ते थोडक्यात बचावले. पहारेकरी घुगे यांनी आरोपीच्या गाडीला गेट आडवे लावून अडवण्याचा प्रयत्न केला असता गाडी भरधाव चालवत आरोपी पसार झाला.

सदर आरोपी एम. एच क्रमाक 03 ए. डब्लू 2821 क्रमांकाची गाडी घेऊन पळत असताना तो आकाश चोंदे असल्याचे पहारेकरी घुगे व वकील संघाचे अध्यक्ष संदीप पवार यांनी अोळखले. कलम 307 प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एस. आय. शकील शेख करीत आहेत.