बँक कर्मचाऱ्यांचा दोन दिवस संप ; सोमवारी कामे उरकून घ्या

वृत्तसंस्था : पोलीसनामा ऑनलाईन – ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन आणि भारतीय बँक कर्मचारी संघाने आगामी ८ ते ९ जानेवारी रोजी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मंगळवार (दि. ८) आणि बुधवार (दि. ९) जानेवारी रोजी देशातील बँकांच्या व्यवहारास फटका बसणार आहे. सरकारच्या कामगार विरोधी योजनांविरोधात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी हा संप पुकारला आहे.
देशातील दहा केंद्रीय कामगार संघटनांनी पुन्हा बँक बंदची हाक दिली आहे. मंगळवारी आणि बुधवारी संपाची हाक दिल्यामुळे तुमची बँकेतील महत्त्वाची कामं सोमवारीच करुन घ्या, कारण संपामुळे काही प्रमाणात कामकाज ठप्प होऊ शकते. अलाहाबाद बँकेने सेबीला पत्र पाठवून या दोन दिवशी बँक व्यवहार विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर, बँक ऑफ बडोदानेही असाच अंदाज व्यक्त केला आहे.
यापूर्वी २६ डिसेंबर रोजीही जवळपास १० लाख कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता.
विजया बँक आणि देना बँक यांच्या बँक ऑफ बडोदामधील विलीनीकरणाच्या प्रस्तावामध्ये दुरुस्ती करण्यासाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने (यूएफबीयू) शुक्रवारी २१ डिसेंबर रोजी संप पुकारला होता. त्यानंतर पुन्हा उद्या २६ डिसेंबर रोजी संप पुकारण्यात येत असून अनेक बँकांनी त्यांच्या ग्राहकांना संपाची पूर्वसूचना दिली आहे. उद्या सार्वजनिक बँकांचे व्यवहार ठप्प राहणार असले तरी खासगी बँका सुरू राहतील, असं सूत्रांनी सांगितलं.

ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन, नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉइज आणि नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स आदी नऊ संघटनांचा यूएफबीयूमध्ये समावेश असून त्यांचे एकून दहा लाख कर्मचारी सदस्य आहेत. सरकारने विजया बँक व देना बँक या दोन सरकारी बँकांच्या बँक ऑफ बडोदात विलीनीकरणाची घोषणा केली होती. हे विलीनीकरण या बँकांच्या किंवा बँक ग्राहकांच्या हिताचे नाही; किंबहुना हे घातक आहे, असं यूएफबीयूने म्हटले होते.