दोन पाकिस्तानी सुनांची वाघा बॉर्डरवरून भारतात सासरी पाठवणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि पाकिस्तानमध्ये विरहात राहणाऱ्या दोन जोडप्यांची पुन्हा एकदा भेट झाली आहे. पाकिस्तानात राहणाऱ्या दोन विवाहीत महिला राजस्थानातील बरमार या आपल्या सासरी वाघा-अटारी बॉर्डरच्या माध्यमातून परतल्या आहेत. सोमवारी (दि. 8) जागतिक महिला दिनी त्यांना भारताकडे सुपूर्द केले आहे. यावेळी बॉर्डरवर त्यांच्या पतींकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांचे काही मोजके नातेवाईक देखील उपस्थित होते.

महेंद्र सिंह यांची पत्नी छगन कंवर आणि नेपाळ सिंह यांची पत्नी कैलाशबाई यांना भारताकडे सूपूर्द केले. नेपाळची पत्नी कैलाश तिच्या आई तसेच भावासोबत भारतात आली आहे. तर महेंद्रची पत्नी छगन कंवर तिच्या वडिलांना सोबत घेऊन भारतात आली आहे.

वाघा अटारी बॉर्डर ओलांडल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची तपासणी केली. तसेच त्यांची कोरोनाची चाचणीही करण्यात आली. यावेळी नेपाळ सिंह म्हणाले की, पत्नीशी भेटून खूप आनंद झाला आहे. मात्र लहान भावाच्या पत्नीला भारतात येण्यासाठी व्हिसा मिळाला नाही,याची खंत वाटते. तसेच त्यांनी पत्नीला व्हिसा मिळवून देण्यासाठी मदत करणाऱ्या केंद्रीय मंत्री कैलाश चौधरी यांचे त्यांनी आभार मानले आहे. 27 वर्षीय नेपाळ सिंह भाटी आणि विक्रम सिंह भाटी हे जैसलमेर जिल्ह्याचे रहिवासी आहेत. दोघां भावंडानी गेल्या वर्षी जानेवारीमध्ये पाकिस्तानातील हिंदू मुलींशी लग्न केले होते. लग्नानंतर ते दोघेही 3 महिने पाकिस्तानात राहिले. मात्र, त्यांच्या पत्नींला व्हिसा नाकारल्यानंतर ते दोघेही तसेच परतले होते. तसेच महेंद्र यांनी देखील एप्रिल 2017 मध्ये पाकिस्तानी मुलीशी लग्न केले होते. मात्र, छगन यांचा व्हिसा नाकारल्यामुळे त्यांना वेगवेगळ रहावे लागले होते. त्यांच्या पत्नीचा व्हिसा नाकारल्यामुळे त्यांना देखील विरहात काही दिवस काढावे लागले होते. याबाबतच वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिले आहे.