दुर्दैवी ! लग्नपत्रिका वाटप करून परतणार्‍या आजोबांचा नातवासह मृत्यू

कुर्डुवाडी : पोलीसनामा ऑनलाइन – भावाच्या लग्नाची पत्रिका माढा तालुक्यातील बारलोणी येथे पाहुण्यांना वाटून माघारी परतणाऱ्या आजोबा आणि नातवावर काळाने झडप घातली. अभिजित रमेश मोरे (वय – 22 रा. कण्हेरगाव) आणि आजोबा महादेव नामदेव डांगे (वय – 70 रा. पिंपळनेर) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. पत्रिका वाटून हे दोघे दुचाकीवरून कण्हेरगाव येथे परतत असताना कुर्डु गावच्या हद्दीत समोरून येणाऱ्या पिकअपची समोरासमोर धडक बसली. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कण्हेरगाव येथील किशोर रमेश मोरे याचे लग्न 14 फेब्रुवारीला होणार आहे. या लग्नाच्या पत्रिका देण्यासाठी किशोरचा भाऊ अभिजित आणि आजोबा महादेव हे रविवारी बारलोणी येथे नातेवाईकांना पत्रिका देण्यासाठी गेले होते. पत्रिका देऊन परतत असताना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना पिकअप (एमएच 24 एबी 6325) ने दुचाकीला (एमएच 45 डब्लू 9943) जोरात धडक दिली. समोरासमोर झालेल्या धडके दुचाकीवरील आजोबा आणि नातू गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर पिकअप चालक वाहन घटनास्थळी सोडून पळून गेला. अपघाताची माहिती मिळताच कुर्डुवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. दरम्यान, या घटनेमुळे लग्न घरात शोककळा पसरली आहे. कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलीस पिकअप चालकाचा शोध घेत आहेत.