आता पदवीचं शिक्षण होणार 4 वर्षाचं, त्यानंतर थेट PhD – UGC मोठ्या बदलाच्या तयारीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपण ग्रॅज्युएशन करत असाल तर आपल्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. विद्यापीठ अनुदान आयोग (UCG) पदवीच्या अभ्यासक्रमांमध्ये मोठे बदल करण्याची तयारी करत आहे. युजीसी लवकरच एक यंत्रणा राबविण्याचा विचार करीत आहे ज्यामध्ये पदवीचा कालावधी तीन वर्षांऐवजी चार वर्ष करण्यात येईल आणि हा चार वर्षांचा अभ्यासक्रम देशातील सर्व विद्यापीठांना लागू असेल. शिक्षण धोरणात झालेल्या या बदलाला योग्य आकार देण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने एक समिती नेमली होती. या समितीने अनेक शिफारसींसह आपला अहवाल यूजीसीकडे सादर केला आहे. आता यूजीसी या शिफारसींवर विचार करीत आहे.

चार वर्षे पदवी घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना थेट पीएचडी करता येईल. सध्या कार्यरत असलेल्या प्रणालीत तीन वर्षे पदवी घेतल्यानंतर पदव्युत्तर पदवी पूर्ण करून मगच पीएचडीला अ‍ॅडमिशन मिळते. नवीन चार वर्षाचा कोर्स लागू केल्यास विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी प्रथम दोन वर्षे पदव्युत्तर पदवी घेण्याची आवश्यकता राहणार नाही. थेट पीएचडी करू शकणार आहे. युजीसीचे अध्यक्ष प्रा. डीपी सिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे.

चार वर्षांच्या पदवीनंतर एखाद्या विद्यार्थ्यास पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे असेल तर तो घेऊ शकतो. सध्या, काही पदवीधर अभ्यासक्रम आधीच चार वर्षांचे आहेत. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बीटेक) आणि बॅचलर ऑफ इंजीनियरिंग (बीई) हे चार वर्षांचे कोर्स आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) ज्या शिफारशींचा गांभीर्याने विचार केला आहे त्यामध्ये पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी तीन ते चार वर्षांपर्यंत वाढविणे समाविष्ट आहे. सर्व बाबी चांगल्या प्रकारे समजून घेतल्यानंतरच यूजीसीला चार वर्षाचा कोर्स राबवायचा आहे, अशी यूजीसीची इच्छा आहे. तथापि, हे नवीन धोरण कधी अंमलात आणले जाईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण अनुमानानुसार पुढील वर्षासाठी त्याची अंमलबजावणी होऊ शकते.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like