दुर्देवी ! चंद्रभागा नदीत बुडून 3 चिमुकल्यांसह एका महिलेचा मृत्यू, 2 महिला गंभीर

अमरावती : येथील चंद्रभागा नदीत एका महिलेसह तीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याघटनेतील आणखी दोन महिलीांची प्रकृती अत्यावस्थ आहे. हे सर्व कुटुंबिय अधिक मासातील पूजा आणि आंघोळ करण्यासाठी गावाशेजारच्या चंद्रभागा नदीवर गेले होते. हे सर्व धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंभोरा राज या गावातील रहिवासी आहेत. प्रकृती चिंताजनक असलेल्या दोन महिलांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुष्पा दिलीप चवरे (32) आणि यश प्रमोद चवरे (11), जीवन प्रदीप चवरे (15), सोहम दिनेश झेले (12) अशी मृतांची नावे आहेत. तर बेबी प्रदीप चवरे (35), राधा गोपाळराव मलीये (38) यांची प्रकृती चिंताजनक आहे.

हे कुटुंबीय आज सकाळी 6 वाजता आंघोळ व पूजा करण्यासाठी चंद्रभागा नदीपात्रात गेले होते. मृतांपैकी जीवन यंदा दहावी वर्गात शिकत होता तो त्याची आई बेबीसोबत गेला होता. जीवनची आई बेबीची प्रकृती चिंताजनक आहे. तर मृत यश हा सहावीत शिकत होता. सोहम चौथ्या वर्गात शिकत होता. अत्यावस्थ असलेली पुष्पा चवरे ही महिला पोलीस पाटील दिलीप चवरे यांची पत्नी आहे.

नदीवर पूजा आणि आंघोळ करण्यासाठी गेलेले हे कुटुंबिय आंघोळीसाठी पाण्यात उतरले असता पाणी खोल असल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. घटनेची माहिती मिळताच गामस्थांनी नदीवर धाव घेतली आणि तीन महिलांचे प्राण वाचवले.

गावाशेजारी ज्या नदीत ही घटना घडली त्या चंद्रभागा नदीचे पात्र या ठिकाणी खुप खोल आहे. समृद्धी महामार्गासाठी बेकायदेशी उत्खनन नदी पात्रात केल्याने नदीची खोली तब्बल 10 मीटरपर्यंत वाढली आहे. इतक्या खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळेच ही घटना घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

यामुळेच संतप्त ग्रामस्थांनी समृद्धी महामार्गाचा संबंधीत ठेकेदार आणि दोषी अधिकार्‍यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे म्हटले. दरम्यान, स्थानिक आमदार प्रताप अडसड यांनी घटनेची अधिक चौकशी करण्याचे आदेश तालुका प्रशासनाला दिले आहेत.