फर्ग्युसन कॉलेजला विद्यापीठाचा दर्जा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील १८८५ साली स्थापन झालेल्या फर्ग्युसन महाविद्यालयाचा एक वेगळाच नावलौकिक आहे. पुण्यातील जुन्या आणि प्रसिद्ध महाविद्यालयांपैकी हे एक आहे. आता एफ. सी कॉलेजच्या नावलौकिकात अजून भर टाकणारी बाब म्हणजे, या महाविद्यालयाला विद्यापीठाचा दर्जा मिळाला असून विद्यापीठाला ५५ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. आशी घोषणा काल करण्यात आली.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानातर्फे (रुसा) स्वायत्त आणि राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेचे (नॅक) ‘अ’ आणि त्यापेक्षा अधिक श्रेणी असणाऱ्या साधारण राज्यातील ५० महाविद्यालयांना विद्यापीठात अपग्रेड होण्याबाबत विचारणा करण्यात आली होती. त्याअंतर्गत फग्युर्सन कॉलेजला विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे. एफ सी महाविद्यालयाबरोबरच बंगळूरच्या शासकिय विज्ञान महाविद्यालय आणि सेंट जोसेफ कॉलेजला विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे. याबरोबरच मुंबईमधील सेंट झेवियर्स आणि मिठीबाई महाविद्यालयानीदेखील विद्यापीठाचा दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव पाठवला होता. मात्र या दोन्ही महाविद्यालयांना प्रतिक्षा करावी लागणार असे वृत्त आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना लोकमान्य टिळक व समाजसुधारक आगरकर यांच्या पुढाकाराने झाली होती. विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यामुळे विद्यार्थ्याना अधिकाधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळणार आहेत.