भारत भालके यांच्या मुलाची ‘विठ्ठल’च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड, शरद पवारांचा शब्द महत्वाचा ठरला

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भगीरथ भालके यांची आज (दि. २१, सोमवार) बिनविरोध निवड करण्यात आली. सहाय्यक निबंधक एम. एस. तांदळे यांनी याबाबतची घोषणा केली.

एम. एस. तांदळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत १८ संचालकांनी भगीरथ भालके यांच्या नावास पसंती दर्शवली. भगीरथ भालके हे मागील दहा वर्षांपासून संचालक मंडळात कार्यरत आहेत. नुकतेच आमदार भारत भालके यांचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर पंढरपूरच्या राजवाड्याची (श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखाना ) सूत्रे कोणाकडे जाणार याकडे विठ्ठल परिवारासोबत जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

तथापि, कै. औदूंबरअण्णा पाटील यांचे नातू युवराज पाटील यांनी अध्यक्षपदासाठी आपण इच्छुक असल्याचे सांगितले होते. मात्र, २१ संचालकातील तीन जणांचे निधन झाल्याने १८ संचालकांनी भगीरथ भालके यांच्या नावावर एकमत केले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भालके यांच्या कुटूंबियांच्या भेटीसाठी पंढरपूरला आले होते. तेव्हा त्यांनी आपल्याला सर्वाना सोबत घेऊन काम करायचे आहे, असे म्हटले होते. त्याच पार्श्वभूमीवर बैठकीत सर्वच संचालकांनी भगीरथ भालके यांच्यावर विश्वास टाकत त्यांची बिनविरुद्ध निवड केली. निवडीनंतर पंढरपूर तालुक्यातून भगीरथ भालके यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.