अभिमानास्पद ! बारामतीकर डॉक्टरांच्या संशोधनास अमेरिकेनं देखील मानलं प्रमाण

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – बारामती येथील काही डॉक्टरांनी केलेल्या संशोधनास अमेरिकेमध्ये प्रमाण मानण्यात आले आहे. भारतीय डॉक्टरांच्या संशोधनास अमेरिकेसारख्या प्रगत देशाने स्थान देण्याची ही दुर्मिळ घटना आहे. बारामतीकरांच्या दृष्टीने ही अभिमानास्पद बाब असून डॉक्टरांच्या टीमचे कौतुक केले जात आहे.

अमेरिकेच्या एन्व्हॉर्यमेंटल पॉलिसी एजन्सी (युएस ईपीए) या संस्थेने बारामतीत डॉ. कीर्ती पवार, डॉ. रमेश भोईटे, डॉ. चंद्रकांत पिल्ले, डॉ. सुजाता चव्हाण, डॉ. धनंजय माळशिकारे यांच्या टीमने किटकनाशके सेवन केल्यामुळे होणारी विषबाधा या विषयातील संशोधनावर केलेले काम व वैद्यकीय क्षेत्रात नामांकीत दि लॅन्सेट या जगप्रसिध्द जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनास प्रमाण मानले आहे. मॉडरेट टू सिव्हीयर पेस्टिसाईड पॉयझनिंग मध्ये त्यांनी लिहीलेल्या औषधमात्रेला ट्रीटमेंट स्ट्रॅटेजी मानण्यात आले आहे.

सन 2013 ते 2018 या कालखंडातील मार्गदर्शिकेमध्ये डॉ. कीर्ती पवार यांच्या शोधनिबंधास अग्रगण्य स्थान दिले गेले आहे. या शिवाय ब्रिटिश मेडिकल जर्नल (BMJ) मध्येही या शोधनिबंधास क्लिनिकल गाईड मानले आहे. विषबाधेवर हे संशोधन रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. हे संशोधन जागतिक पातळीवर पोहोचण्यासाठी डॉ. रमेश भोईटे, डॉ. सतीश पवार, डॉ. शिरीष प्रयाग, डॉ. दिलीप कर्नाड, डॉ. जे.व्ही. दिवाटीया, समाजसेविका श्यामला देसाई या सर्व मार्गदर्शकांचे मोठे योगदान होते, असे डॉ. कीर्ती पवार यांनी नमूद केले.

बारामती येथील गिरीराज हॉस्पिटल येथे केलेले संशोधन ज्यात डॉ. पवार यांनी सुचवलेल्या प्रॅलिडॉक्साईम या अँटीडोटच्या मात्रेला दुजोरा दिला आहे व हीच मात्रा गंभीर व अतिगंभीर स्वरूपाचे विषबाधेचे रुग्ण वाचविण्यासाठी उपयोगी ठरू शकते असे अमेरिकेतील एन्व्हॉर्यमेंटल पॉलिसी मध्ये नमूद केले आहे.