पेट्रोल दरवाढीवरून सौदीने भारताला दिला वेगळाच सल्ला, म्हणाले – ‘तुम्ही ते गेल्या वर्षी खरेदी केलेले स्वस्त तेल वापरा’

पोलीसनामा ऑनलाईन – पेट्रोल दरवाढीसाठी महत्त्वाचे कारण ठरलेल्या कच्च्या तेलाच्या किमती कमी व्हाव्यात, यासाठी भारताने OPEC या कच्चे तेल पुरवठा करणाऱ्या देशांच्या संघटनेकडे तेलाचे उत्पादन वाढविण्याची मागणी केली होती. मात्र, ओपेकचा प्रमुख घटक असलेल्या सौदी अरेबियाने उलट भारतालाच सुनावले आहे. तुम्ही गेल्या वर्षी खरेदी केलेले स्वस्त दरातील तेल वापरा, असे सौदीने भारताला सांगितले आहे. त्यामुळे सध्यातरी ओपेककडून उत्पादन वाढवून कच्च्या तेलाच्या किमती खाली येण्याची शक्यता कमी दिसत आहे.

OPEC ने नुकत्याच झालेल्या व्हर्च्युअल बैठकीत तेलाचे उत्पादन न वाढवण्यावर सहमती दर्शवली आहे. यावेळी भारताचे पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी उत्पादनावरील निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली. यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा वाढून त्याच्या किमती कमी होतील, पर्यायाने भारतातील पेट्रोलचे भाव कमी होतील. मात्र, ओपेक देशांनी भारताची ही मागणी फेटाळली. याबाबत सौदीचे ऊर्जामंत्री प्रिन्स अब्दुलअजीझ बिन सलमान यांनी भारताला वेगळाच सल्ला दिला आहे.

भारताने त्यांच्या साठ्यामधून गेल्या वर्षी अत्यंत स्वस्त दरात खरेदी केलेले कच्चे तेल वापरावे, असे ते म्हणाले. गेल्या वर्षी एप्रिल-मे मध्ये कच्च्या तेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 19 डॉलर प्रतिबॅरलच्या होत्या. त्यावेळी भारताने जवळपास 1 कोटी 67 लाख बॅरल कच्च्या तेलाची खरेदी करून विशाखापट्टणम आणि मंगलोर, पदुरच्या स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हमध्ये ठेवले आहे ते तेल वापरावे, असा सल्ला सलमान यांनी दिला आहे.