रिफिलिंगदरम्यान ऑक्सिजन सिलेंडरचा भीषण स्फोट; तिघांचा मृत्यू, 5 गंभीर जखमी

लखनौ : वृत्त संस्था – ऑक्सिजन प्लांटमध्ये रिफिलिंगदरम्यान सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याने तिघांचा मृत्यू झाला. तर 5 जण जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील चिनहट ऑक्सिजन प्लांटममध्ये बुधवारी (दि. 5) दुपारी 3 च्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. घटनास्थळी पोलिसांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले असून मृत आणि जखमीची नावे अद्याप समजू शकले नाहीत.

मिळालेल्या माहितीनुसार, चिनहट येथील केटी वेल्डिंग स्टोर ऑक्सिजन प्लांटमध्ये दुपारी जम्बो सिलेंडरमध्ये रिफिलिंग करताना भीषण स्फोट झाला. स्फोट एवढा भीषण होता की, प्लांटचे छत स्फोटात उडाले आहे. या स्फोटात प्लांटमध्ये काम करणा-या तिघांचा मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे.

पोलीस आयुक्त डीके ठाकूर आणि जिल्हाधिकारी अभिषेक प्रकाश घटनास्थळी दाखल झाले आहेत. फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॅड प्लांटमध्ये दाखल झाले असून तपास सुरु केला आहे. दरम्यान यापूर्वी उत्तर प्रदेशातील कानपूरच्या पनकी ऑक्सिजन प्लांटमध्ये रिफिलिंगदरम्यान स्फोट झाला होता. यात एका मजुराचा मृत्यू झाला होता, तर 2 जण जखमी झाले होते.