प्रेमासाठी काहीही…या’ पक्षाच्या नेत्याने ‘गर्लफ्रेंड’साठी केले असे काही ; नेत्यास अटक तर प्रेयसी फरार

अलीगढ (उत्तर प्रदेश) : वृत्तसंस्था- गर्लफ्रेंडसाठी एमबीएचा पेपर फोडणाऱ्या बहुजन समाज पक्षाच्या नेत्याला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. तर या घटनेची माहिती मिळताच नेत्यांची गर्लफ्रेंड फरार झाली आहे. फिरोज आलम उर्फ राजा असे या नेत्याचे नाव असून त्याने आपल्या प्रेयसीसाठी अलीगढ मुस्लीम युनिवर्सिटीच्या एका कर्मचाऱ्याच्या मदतीने एमबीएचा पेपर फोडण्याचा प्रयत्न केला. फिरोज याने पेपर फोडण्यासाठी युनिवर्सिटीमधील कर्मचारी इर्शाद याची मदत घेतली. त्याने इर्शादला विश्वविद्यालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखवले होते.

पोलिसांनी फिरोजकडे चौकशी केली असता, प्रेयसीला पेपर आणून देण्याचे वचन दिले होते. त्यासाठी त्याने प्रेयसीला खोटा पेपर आणून दिला. मात्र, तिच्या लक्षात आल्यानंतर ती नाराज झाली होती. तिचा रुसवा काढण्यासाठी मित्राच्या मदतीने इर्शादला पेपर फोडण्यासाठी तयार केल्याचे त्याने सांगितले.

अलीगड पोलीस आयुक्त आकाश म्हणाले, ज्या ठिकाणी आरोपी आणि त्याची प्रेयसी भेटत होते ते घर पोलिसांनी सील केले आहे. हे घर आरोपीचा मित्र हैदर याचे काका तहसीम सिद्धीकी यांचे आहे. तहसीम सिद्धीकी हे सपाचे अध्यक्ष अखिलश यादव यांचे निकटवर्तीय आहेत. आरोपींची एक टोळी असून दोन हजार रुपयांना ते परिक्षांचे पेपर विकत होते. तसेच या टोळीने प्रवेश परिक्षासाठी एक व्हॉटस्अॅप ग्रुप तयार केला होता. आत्तापर्य़ंत या टोळीने अनेकांची फसवणूक केल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत.