उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत

नवी दिल्ली : वृत्त संस्था – तीरथ सिंह रावत हे उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. आज दुपारी चार वाजता तीरथ सिंह रावत हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या इतर नावांत अजय भट्ट, सतपाल महाराज, धनसिंह रावत, अनिल बलुनी, रमेश पोखरीयाल निशंक यांचा समावेश होता. यातील धनसिंह रावत, निशंक यांची नावे आघाडीवर होती. सोमवारी त्रिवेंद्र सिंह रावत यांनी राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा दिला होता. बैठकीत त्यांची सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली. या बैठकीला भाजपचे सर्व आमदार उपस्थित होते.

सध्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी बैठकीनंतर मुख्यमंत्रिपदासाठी तीरथ सिंह रावत यांच्या नावाची घोषणा केली. आज सकाळी साडेदहा वाजता झालेल्या बैठकीत तीरथ सिंह रावत यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री रमन सिंह आणि भाजपचे प्रदेश प्रभारी दुष्यंत कुमार गौतम पर्यवेक्षक म्हणून उपस्थित होते. आज देहराडून येथे भाजपच्या कार्यालयात आमदारांच्या बैठकीत तीरथ सिंह रावत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

उत्तराखंड राज्याची स्थापना झाल्यापासून मागील दोन दशकांत नारायणदत्त तिवारी वगळता एकाही मुख्यमंत्र्याला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. यात महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचाही समावेश आहे. त्यामुळेच कोश्यारीही या वेळी मुख्यमंत्रिपदासाठी उत्सुक होते.