‘व्ही फॉर व्हिक्टरी’ : खासदार उदयनराजे

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील तू तू मै मै काही नवीन नाही. यापूर्वी जेव्हा हे दोन्ही राजे एकमेकांना भेटले होते तेव्हा उदयनराजेंनी शिवेंद्रराजे यांच्या खांद्यावर हात ठेवला होता. तेव्हा शिवेंद्रराजे यांनी याबाबत विचारल्यावर तुझा फिटनेस चेक करतोय असे उत्तर दिले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा आज यवतेश्‍वर घाटात हे दोघे आमने सामने आले तेथे रनींग करणाऱ्या स्पर्धकांशी बातचीत केली. यावेळी खासदार उदयनराजे यांनी तुम्ही एवढं पळवले की दोघांचे पळण्याची आता हाऊसच फिटली आहे, अशी मार्मिक टिप्पणी केली. दरम्यान दोन्ही राजांनी हातात हात घालून ‘व्ही फॉर व्हिक्टरी’ची खूण दाखवली.

गेल्या काही महिन्यांपूर्वी एकमेकांची नजरानजर टाळण्यासाठी आटापिटा करणारे खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे ‘तुझ्या गळा, माझ्या गळा गुंफू लोकसभा-विधानसभेच्या माळा’ असा सूर आळवला जात आहे. आगामी लोकसभा- विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येवून ठेपलेल्या आहेत. सत्तेत नसल्यामुळे राष्ट्रवादीसह कॉंग्रेसचीही जिल्ह्यात वाताहत झाली आहे. असे असताना रुसवे-फुगवे, तंटे-बिखेडे विसरुन हातात हात घालून आगामी निवडणुका लढवल्या तरच भाजपचा वारु थोपवता येणार आहे, हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांना माहीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून खासदार पवारांचे सातारा विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने सातारा दौरे वाढले आहेत. यानिमित्ताने ते जिल्ह्यातील लोकसभेचा व विधानसभेची गोळाबेरीज करत असतात. त्यामुळे पवारांनी ‘एकला चलो रे’ म्हणणार्‍या उदयनराजेंचा हात पुन्हा हातात घेत थोडं सबुरीनं घ्या, डोकं शांत ठेवा, असा सल्ला काल झालेल्या कार्यक्रमात दिला.

दरम्यान, कालपासून विविध कार्यक्रमात हातात हात घालून फिरणार्‍या सातारच्या आमदार- खासदारांनी आज यवतेश्‍वर घाटातील प्रकृती रिसॉर्ट येथे सातारा रनर्स फौंडेशनच्या आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. खा. उदयनराजे भोसले व आ शिवेंद्रराजे भोसले यांनी ‘व्ही फॉर व्हिक्टरी’ची खूण दाखवत ‘अब हम दो नहीं, एकही हैं’ अशी खूण दाखवत किमान येणार्‍या निवडणुकीत तरी तेरी मेरी यारी, ‘व्ही फॉर व्हिक्टरी’ असे म्हणत ‘तुझ्या गळा, माझ्या गळा गुंफू लोकसभा-विधानसभेच्या माळा,’ असे संकेत दिले.