संयुक्त राष्ट्र प्रमुखांकडून भारताची प्रशंसा, म्हणाले – ‘जगाला लस पुरवण्याची इंडियाकडे क्षमता’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वात मोठा लोकसंख्येचा देश म्हणून भारत जगात दुसऱ्या स्थानावर आहे. सध्या भारत जगभरातील अनेक देशांना कोरोना लशीचा पुरवठा करत आहे. भारतातही लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली आहे तसंच भारत शेजारधर्माचेही पालन करत आहे. भारताच्या याच उदारपणामुळे अनेक देश कौतुक करत आहेत. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राचे महासचिव ऐंतोनियो गुतेरस यांनीही भारतावर स्तुतीसुमने उधळली आहेत. एनएनआय या वृत्त संस्थेने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

“मला माहिती आहे की भारतात मोठ्या प्रमाणात स्वदेशी कोरोना लशीची निर्मिती केली जात आहे. आम्ही यासाठी भारताच्या संपर्कात आहोत. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, भारत जगभरातील लसीकरण मोहिमेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल. मला वाटतं की कोरोना लस निर्माण करण्याची क्षमता भारताकडे जगात सर्वाधिक आहे. भारत मोठ्या प्रमाणात लस तयार करत आहे. भारत संपूर्ण जगाला मदत करेल असा विश्वास आहे. भारताने आतापर्यंत ५५ लाख लशीचे डोस शेजारी देशांना गिफ्ट म्हणून दिले आहेत,” यावेळी मीडियाशी बोलताना संयुक्त राष्ट्र प्रमुख म्हणाले.

दरम्यान, देशात कोरोना लसीकरण सुरु झालं आहे. आतापर्यंत देशात जवळपास २० लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड-१९ लस देण्यात आली आहे. भारत सरकारने सीरम इन्स्टिट्यूटची कोनिशिल्ड आणि स्वदेशी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. सध्या प्रामुख्याने देशात कोवॅक्सिन लशीचा डोस दिला जात आहे. पहिल्या टप्प्यात देशातील ३ कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लशीचा डोस देण्यात येत आहे.

आठवड्याच्या बैठकीदरम्यान गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटलं की, भारत आता ओमान, CARICOM देश, निकारगुआ, पॅसिफिक आयलँड स्टेट्स यांनाही कोरोनाची लस गिफ्ट म्हणून देण्याची योजना बनवत आहे. भारताने सांगितलं की, आफ्रिकी देशांना १ कोटी आणि संयुक्त राष्ट्राच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना १० लाख कोरोना लस देण्यात येणार आहेत.