Pune News : अदर पूनावाला यांनी टोचून घेतली लस, ‘कोविशिल्ड’ सुरक्षित असल्याचा दिला संदेश (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अवघ्या जगाचे लक्ष लागून असलेल्या व जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी असलेल्या सिरम इन्स्टिट्यूट निर्मित ‘कोविशिल्ड’ या कोरोना प्रतिबंधक लसचे देशात आजपासून (शनिवार) लसीकरण सुरु झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लसीकरणाचा शुभारंभ झाला. तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत लसीकरणाला सुरुवात झाली आहे.

मागील काही दिवसांपासून अविरत मेहनत व संशोधन करुन ‘कोविशिल्ड’ या लसीद्वारे जगाला कोरोना संकटावर मात करण्यासाठी आशेचा किरण दाखवणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूच्या आज सुरु झालेल्या लसीकरण मोहिमेद्वारे ध्येयपूर्ती झाली आहे. यावेळी लस सुरक्षित असल्याचा महत्वपूर्ण संदेश देत सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक अदर पूनावाला यांनी स्वत: ‘कोविशील्ड’ लस टोचून घेतली आहे. ही माहिती त्यांनी आपल्या ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत दिली.

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अँस्ट्रॉझेनिका कंपनीत विकसित केलेल्या ‘कोव्हीशिल्ड’ लसीचे उत्पादन झाले. तीन टप्प्यात मानवी चाचण्या पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली. त्यानंतर या लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी मिळाली. शनिवारी लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर अदर पूनावाला यांनी स्वत: लस टोचून घेतली. लस सुरक्षित असल्याचा संदेश त्यांनी या कृतीतून देशाला दिला आहे.

लसीकरणाचा व्हिडीओ ट्विट करताना अदर पूनावाला म्हणाले, लसीकरण मोहीमेबद्दल मी संपूर्ण देशाचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. लसीकरण मोहीम भारतात पार पडत आहे. कोव्हीशिल्डच्या यशामागे अनेकांचे परिश्रम आहेत. या यशाचा मला अभिमान वाटतो. लस सुरक्षित आणि परिणामकारक आहे, हा संदेश आरोग्य कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी लसीकरण करुन घेत आहे, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.