वृत्तसंस्था :
अनेक नागरिकांना आपल्या बँक खात्याचे पासवर्ड, त्याच्या डिटेल्स मोबाईल किंवा संगणकामध्ये सेव्ह करून ठेवण्याची सवय असते. मात्र आता ही सवय तुमच्यासाठी घातक ठरू शकते. तसेच हे पासवर्ड कोणी चोरले तर तुमच्या अनेक व्यवहारांना यामुळे धोका निर्माण होऊ शकतो.
आता इंटरनेच्या मायाजालामध्ये आता असा एक व्हायरस वेगाने सक्रिय झाला आहे. तो तुमचे क्रोम आणि फायरफॉक्स या ब्राऊजरमध्ये सेव्ह असलेले सर्व पासवर्ड चोरु शकतो. सर्वात गंभीर बाब म्हणजे या व्हायरसमुळे तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर डेबिट आणि क्रेडिट कार्डसचे डिटेल्स सेव्ह केले असतील तर तेही चोरले जाऊ शकतात. त्यामुळे हा व्हायरस अत्यंत घातक आहे. या व्हायरसचे नाव व्हेगा स्टेलर असून याची निर्मिती खास संवेदनशील माहिती चोरण्यासाठीच करण्यात आली आहे.
हा व्हायरस मार्केटींग, जाहिरात आणि जनसंपर्क या क्षेत्रात अतिशय वेगाने पसरवला जात आहे. ईमेलच्या साह्याने देखील हा व्हायरस पसरवला जातोय. या ईमेलचा सब्जेक्ट Online Store developer required आहे. या व्हायरसला publicaffairs@, info@, clientservice@ या माध्यमातून सक्रिय केलं जात आहे. ईमेलसोबत brief.doc ही अॅटॅचमेंटही पाठवली जात आहे. हा व्हायरस कॉम्प्युटरमधील .doc, .docx, .txt, .rtf, .xls, .xlsx, .pdf या फाईल्स सर्च करुन त्याद्वारेही माहितीची चोरी करण्याचा प्रयत्न करतो आहे.