वैशाली येडे लोकसभेच्या रिंगणात , बच्चू कडू यांच्याकडून अधिकृत घोषणा

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन – ९२ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ज्यांनी उदघाटन केले त्या वैशाली येडे यांना प्रहारकडून लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. याची अधिकृत घोषणा प्रहारचे पक्षप्रमुख बच्चू कडू यांनी आज (गुरुवारी) केली. वैशाली येडे ह्या यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. अमरावती येथे वैशाली येडे यांच्या उमेदवारी संदर्भात अंतिम निर्णय घेण्यात आला.

प्रहार मध्ये वैशाली येडे यांचे स्वागत पक्षप्रमुख आमदार बच्चू कडू , डॉ. प्रा. नयनाताई कडू यांनी केले. यावेळी ‘प्रहार’चे कार्याध्यक्ष बल्लू जवंजाळ, राज्य संपर्कप्रमुख प्रमोद कुदळे, जिल्हाप्रमुख नितीन मिर्झापुरे, जिल्हाप्रमुख विलास पवार, अमरावती जिल्हाप्रमुख वसू महाराज, जिल्हाप्रमुख बिपीन चौधरी, जिल्हासंपर्क प्रमुख आशिष तुपटकर, विद्यार्थी आघाडी जिल्हाप्रमुख रवी राऊत, रूपेश सरडे, प्रशांत आवारे आदी उपस्थित होते.

वैशाली सुधाकर येडे (रा. राजूर , ता. कळंब) या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील आहेत. वादग्रस्त ठरलेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचा मान त्यांना मिळाला होता. वैशाली यांच्या पतीने सात वर्षापूर्वी आत्महत्या केली. त्यांना २ मुले आहेत. तीन एकर शेती आहे. त्या सध्या अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करत आहेत. एक वर्षापासून नाटक क्षेत्राशी त्या जोडल्या गेल्या आहेत. त्यांच्या जीवनावर प्रसिद्ध दिग्दर्शक हरीश इथापे यांनी ‘तेरवं’ नाटक लिहिले आहे. त्यात यांच्या जीवनाचा संघर्ष होता. त्या नाटकांत त्यांनी भूमिका देखील केली आहे.